बुलडाणा - आपण नेहमीच म्हणतो की, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या मागे असतो त्याच्या संघर्षाचा इतिहास, असाच काहीसा संघर्षमय इतिहासाचा प्रवास राजू जिजाबाई आत्माराम केंद्रे या तरुणाचा आहे. शिक्षणाचा गंधही नसलेल्या गावचा उंबरठा ओलांडत मजल दर मजल करत, संकटावर मात करत लोणार सरोवराच्या भूमीतून लंडनच्या विद्यापीठात चेवनिंग शिष्यवृत्तीसाठी राजूची निवड झाली आहे. राजू बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे येथील रहिवाशी आहे. जगभरातील १६० देशातील एक हजार ३५० विद्यार्थ्यांमधून राजूची निवड झाली आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्ती
लंडनची चेवनिंग शिष्यवृत्ती ही अत्यंत मानाची शिष्यवृत्ती मानली जाते. या शिक्षवृत्तीसाठी राजू केंद्रे याची निवड झाली आहे. या शिष्यवृत्तीसाठी १६० देशांतील ६३ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. देशासह समाजात बदल घडवू पाहणाऱ्या तरुणांना इंग्लंडमध्ये उच्चं शिक्षण घेण्यासाठी जवळपास ४५ लाख रुपयांची शिष्यवृत्ती मिळते. राजूला जगातील १८ नामांकित विद्यापीठाने आपल्या विद्यापीठात प्रवेश घेणयासाठी आमंत्रित केले असून, बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे ते लंडन हा शैक्षणिक प्रवासाचा टप्पा राजुने गाठला आहे. यामुळे विदर्भातील मातृतीर्थ असलेला बुलडाणा जिल्ह्याची नव्हे तर महाराष्ट्र आणि देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
आई-वडिलांनी काबाड कष्ट करून राजूला शिकवले
राजूच्या घरची परिस्थिती तशी जेमतेम, आई-वडील शेतकरी आहेत. तसेच, राजूचे वडील दरवर्षी आळंदी ते पंढरपूर अशी वारी करतात. अगदी साधी राहणीमान, मात्र आपल्या दोन्ही मुलांवर चांगले संस्कार या शेतकरी दाम्पत्यांनी केले आहेत. राजूचा मोठा भाऊसुद्धा सेक्युरिटी संस्थेत नोकरीला आहे. तर, आता राजूलाही शिकवायचे आणि त्याला त्याच्या पाययावर उभे करायचे म्हणून आई-वडिलांनी शेतीत काबाड कष्ट केले. या कष्टावर आपल्या राजूला शिकवले. त्यामुळे राजू आज छोट्याशा गावातून लंडनला जात आहे. याचा त्याच्या आई वडिलांना सार्थ अभिमान आहे. शिवाय आमच्या राजूसारखे अनेक राजू तयार व्हावेत अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
राजूचा शिक्षणाचा जीवन प्रवास थक्क करणारा
राजूचा जीवन प्रवासही थक्क करणारा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील अवघ्या हजार बाराशे लोकसंख्या असलेल्या पिंप्री खंदारे या गावात राहणाऱ्या राजूने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून ग्रामीण विकास विषयात शिक्षण घेतले आहे. पद्व्यूत्तर शिक्षण झाल्यावर राजुला महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री फेलोशिपसुद्धा मिळाली आहे. समाजकार्य महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत असतांना, नेट-सेटसारख्या परीक्षाही तो पास झाला आहे. तसेच, राजूने आय-पॅकसारख्या राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या संस्थेसोबतही काम केले आहे. मेळघाट सारख्या दुर्गम भागात तळमळीने काम करणारा राजू आज नव्या वळणावर प्रवासाला सुरुवात करतो आहे. तो जगातील टॉप १०० विद्यापीठातील इंग्लंडच्या विद्यपीठात शिक्षाणासाठी जात आहे.
'राजूचा आदर्श इतरांनीही घ्यावा'
राजूने मागील तीन ते चार वर्षात १०० युवकांना देशातील चांगल्या कॉलेज किंवा विद्यापीठात प्रवेश मिळवण्यासाठी मार्गदर्शनही केले आहे. राजू आपल्या शैक्षणिक प्रवासाविषयी मार्गदर्शनही करतो. शिक्षणाच्या पारंपरीक चौकटी ओलांडून ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांमध्ये नवा दृष्टिकोन आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न राजू करत असतो. आई-वडील जरी शेतकरी असले तरी शिक्षणाच्या प्रवाहात अनेकांना आणायचे काम राजूने केले आहे. याचा आदर्श इतर युवकांनी घ्यावा असे मत राजूच्या आईने व्यक्त केले आहे.