बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंबा ग्रामपंचायतीने चांगला निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र चर्चा आहे. रुईखेड मायंबा ग्रामपंचायतीला महिला सरपंच सुरेखा फेपाळे आहेत, त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने गावातील अवैध धंदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बेकायदा दारू विक्रीने जिल्ह्यातील अनेक संसाराची राख रांगोळी झाली. मात्र राज्य उत्पादन शुल्क म्हणा की, पोलीस यंत्रणा हप्तेखोरीत गुंतल्याचा आरोप होता. अशा परिस्थितीत नारीशक्ती तोंड देऊ शकते हे तालुक्यातील रुईखेड मायंबा येथील महिला सरपंचांनी दाखवून दिले आहे. त्यांनी सात फेब्रुवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन करून बेकायदा दारू विक्री, जुगार मटका बंद करण्याचा निर्णय घेतला.
अवैध धंदे बंदचा ठराव: बुलडाणा तालुक्यातील रुईखेड मायंबा परिसरात वरली मटक्याचा, देशी विदेशी दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू करण्यात आले होते. हे अवैध धंदे बंद करण्याकरता चांडोळ येथील सरपंच, पोलिस पाटील उपोषणाला बसले होते. तसेच रुईखेड येथील युवकांनी देखील मागील वर्षी २ ऑक्टोबर रोजी धाड पोलीस स्टेशन येथे एक दिवसीय धरणे आंदोलन केले होते. तरी देखील सुरु असलेले अवैध धंदे बंद झाले नाही. जागोजागी मोबाइलद्वारे वरली घेण्यात येते. धाडमध्ये पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर स्टॉल लावून वरलीची विक्री सर्रासपणे सुरू आहे. त्यामुळे गावांमध्ये एक समिती गठीत करुन सुरु असलेले अवैध धंदे बंद करण्याकरता ठराव घेण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा अनिल फेपाळे, उपसरपंच ज्ञानेश्वर रामेकर, ग्रामपंचायत सदस्य सतीश वाघमारे, शिवाजी नप्ते, सिद्धार्थ मगर, राहुल काकफळे, विकास उगले, संदीप उगले, अनिल फेपाळे, पोलिस पाटील समाधान उगले यांच्यासह ग्रामस्थत उपस्थिती होते.
माता रमाईंच्या जयंतीदिनी आदर्श पाऊल: रुईखेड मायंबा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने ७ फेब्रुवारी रोजी माता रमाई यांच्या जयंती दिनानिमित्त विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान माता रमाई यांना आदर्श विचारांनी मानवंदना देण्याचे ठरले. या ग्रामसभेमध्ये मागील अनेक दिवसांपासून रुईखेड मायंबासह परिसरात सुरु असलेले वरली, मटकासह इतर अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे दारूबंदी महिला समिती व पुरुषांची एक समिती गठित करण्यात आली व बेकायदा व्यवसाय बंदीचा ठराव घेण्यात आला. तसेच याआधीही ग्रामसभेत अवैध बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यापूर्वी प्रशासनाला यासंदर्भात वेळोवेळी कळविले होते. मात्र त्याने याकडे दुर्लक्ष केले गेले. अखेर गावाच्या महिला सरपंच सुरेखा फेपाळे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून इतर ग्रामस्थांनी सुद्धा याला प्रतिसाद दिला असल्याची माहिती मिळाली आहे.