बुलडाणा - महापरीक्षा पोर्टल हा विषय एकट्या बुलडाण्याचा नसून संपूर्ण राज्याचा आहे. या पोर्टलच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. हे पोर्टल बंद करण्याकरिता येत्या सोमवारी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन त्यांच्या ही बाब लक्षात आणून देणार असल्याचे आश्वासन आमदार संजय गायकवाड यांनी आज उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांना दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी उपोषण मागे घेतले.
हेही वाचा- #HyderabadEncounter: 'त्या' चौघांचा कर्दनकाळ ठरलेला 'एन्काऊंटर मॅन' आहे तरी कोण..
नोकर भर्तीसाठी महापोर्टल वापरले जात आहे. ह्या महापोर्टलमध्ये भर्तीवेळी प्रचंड भ्रष्टाचार झाला असून गोर-गरीब विद्यार्थी नोकरी मिळण्यापासून वंचित राहत आहेत. असा आरोप करीत महापोर्टल तत्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी पदवीधर, उच्च शिक्षित विद्यार्थ्यांनी बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारपासून (5 डिसेंबर) उपोषण सुरू केले. दरम्यान आज शुक्रवारी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी उपोषण ठिकाणी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी लक्षात घेऊन हा प्रश्न संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांचा आहे. महापरीक्षा पोर्टल हे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांचे असून या पोर्टलच्या माध्यमातून अनेक घोटाळे झाले आहेत. खऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांना डावलून आपल्या नातेवाईकांनाच संधी देण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
राज्यातील हजारो होतकरू विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. हे महापरीक्षा पोर्टल त्वरित बंद करण्याकरिता मी येत्या सोमवारी (9 डिसेंबर) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या समोर हा मुद्दा उपस्थित करणार आहे, असे आश्वासन मिळाल्यानंतर उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांनी आमदार गायकवाड यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषणाची सांगता केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, उपजिल्हाप्रमुख भोजराज पाटील, कॉंग्रेसच्या जि.प.सदस्या जयश्रीताई शेळके, डॉ. गोपाल डिके, ओमसिंग राजपूत, प्रविण जाधव, श्रीकृष्ण शिंदे, लखन गाडेकर, राजु मुळे, चंद्रकांत बर्दे, मोहन पऱ्हाड, प्रविण निमकर्डे, कुणाल गायकवाड तसेच अनेक पदाधिकारी उपस्थित होते.