बुलडाणा - तीन वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार शुक्रवारी (24 जुलै) नांदुरा पंचायत समितीच्या मागील भागात घडला. ही बाब समोर आल्यानंतर संबंधित नराधमास नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
बुलडाण्यात तीन वर्षांच्या बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; नराधम गजाआड तीन वर्षांची बालिका घरासमोरील अंगणात खेळत होती. यावेळी नैनेश लक्ष्मणदास रामचंदानी (वय २४) याने त्या मुलीला कडेवर उचलून पंचायत समिती व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या मागील बाजूस नेले. हा भाग ओसाड व झाडाझुडपांचा आहे. यावेळी त्याने बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पंचायत समितीतील एका कर्मचाऱ्याला मुलीच्या रडण्याचा आवाज आला. त्याने काही नागरीक व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह आवाजाच्या दिशेने घटनास्थळ गाठले. तोपर्यंत आरोपीने तिथून पळ काढला होता. यावेळी मुलीच्या गळ्याला तिच्याच कपड्यांनी गळफास देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. काही तरुणांनी या नराधमाचा शोध घेऊन त्याला पकडले; आणि चोप दिला. यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
पीडित बालिकेला नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी खामगाव सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. तसेच आरोपीवर खूनाचा प्रयत्न, बलात्कार व पोक्सो कायद्यानुसार नांदुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.