बुलडाणा - बारामुल्ला येथील दहशतवादी हल्ल्यात चंद्रकांत भाकरे यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थीव संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील त्यांच्या मूळगावी आणून त्यांच्या पार्थिवाची गावात यात्रा काढण्यात आली. यावेळी शहीद चंद्रकांत भाकरे अमर रहे अशा घोषणा देत त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. सैन्यातील जवानांनी हवेत तीन फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. त्यानंतर सोशल डिस्टंन्स राखत शासकीय इतमामात त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. जवान चंद्रकांत भाकरे यांचा सुपुत्र खूश याने त्यांना मुखाग्नी दिला.
यावेळी उपस्थित मंडळींनी वीरजवान चंद्रकांत भाकरे यांना श्रद्धांजली दिली. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी सुमनचंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, जळगाव जामोद मतदार संघाचे आमदार संजय कुटे, सीआरपीएफचे अधिकारी, आरोग्य विभाग आदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
पातुर्डा येथील चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय ३८) हे जवान जम्मु काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे सीआरपीएफ कर्तव्य बजावत होते. १८ एप्रिलला संध्याकाळी सोपोर भागात सीआरपीएफ व पोलिसांची तुकडी गस्तीवर असताना दहशतवाद्यांनी हल्ला चढवला. यावेळी चकमकीत तीन जवान शहीद झाले असून दोघे जखमी झाले आहेत. शहीद झालेल्या जवानामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील पातुर्डा येथील चंद्रकांत भगवंतराव भाकरे (वय ३८) यांच्यासह राजीव शर्मा (वय ४२ रा. वैशाली बिहार ), परमार सत्यपाल सिंग (वय २८ रा. साबरकंठा गुजरात ) यांचा समावेश आहे.