बुलडाणा- झाडाच्या फांद्या तोडताना उच्च दाबाच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून एकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी चिखली तालुक्यातील डोंगरशेवली गावात घडली आहे. प्रताप जनार्दन वानखेडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
डोंगरशेवली गावाला लागून असलेल्या नरहरी इंगळे यांच्या शेतातील बाभळीच्या झाडाला उच्च दाबाच्या विद्युत तारांचा स्पर्श होत असल्याने झाडामध्ये विद्युत प्रवाह येत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. यामुळे शेतमालक इंगळे यांनी झाडाच्या फांद्या छाटण्यासाठी प्रताप वानखेडे यांना बोलविले. यावेळी वानखेडे झाडावर चढले व त्यांनी फांद्या छाटण्यास सुरुवात केली. मात्र, हे काम करण्यापूर्वी त्यांनी वीज वितरण कंपनीला याबाबत माहिती दिला नाही. चालू विज तारा दरम्यान झाडाच्या फांद्या तोडताना त्यांना विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.