बुलडाणा - महिला सबलीकरणाच्या दृष्टिकोनातून महिलांना समान दर्जा मिळावा यासाठी सर्व क्षेत्रात महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, हे आरक्षण फक्त कागदावरच होत असून पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा अजूनही समाजामध्ये कायम असल्याचे चित्र बुलडाण्यात पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील बॅनरवर जाहिराती दरम्यान महिलेचा फोटो न छापता इतर दोन पुरुष उमेदवारांना सोबत महिला उमेदवारांची फक्त सावलीचा फोटो छापण्यात आला आहे. दुसऱ्या बॅनर वर महिला उमेदवाराचे नाव असुन फोटो मात्र त्यांच्या पतीचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिलांना महिलांचा पर्याय नसल्याने फक्त महिला आरक्षणाचा वापर केला जात असल्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.
चेहरा पाहिला नसेल तर मत द्यायचे कुणाला..?
बुलडाणा जिल्ह्यात ८७० पैकी ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणूक होऊ घातलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या जाहिरातीचे गावात पोस्टर लावण्यात आले आहेत, त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील जाहिरात करण्यात येत आहे. ज्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथील महिला उमेदवाराचे पोस्टरवर फोटो छापण्यात आले नसून त्यांची फक्त सावली दाखवण्यात आली आहे. देऊळघाट येथील ग्रामपंचायत उमेदवार महिलांची फक्त नावे आणि उमेदवार महिलांच्या ऐवजी चक्क त्यांच्या पतीचे फोटो छापण्यात आले आहेत, त्यामुळे खरंच महिला सक्षम झाल्याची ही चिन्ह आहेत का? ज्या महिलांना पुरुष आजच लोकाभिमुख होऊ देत नाहीत अश्या महिला निवडून गेल्यास जनतेच्या समस्या काय सोडणार..? जनतेने चेहरा पाहिला नसेल तर मत द्यायचे कुणाला? मते सावलीला द्यायची का? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. बरेचदा राजकीय क्षेत्रात काम करण्याची पात्रता असताना देखील या पुरुषी मानसिकतेने त्यांची कुचंबणा तर होत नाही ना? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत, त्यामुळे महिला सबलीकरण आणि महिलांना समान आरक्षण हे फक्त कागदोपत्रीच असल्याचे दिसत असून पुरुषप्रधान संस्कृतीची मानसिकता अजूनही कायम असल्याचा म्हणता येईल.
निवडणूक आयोगा सोबत चर्चा करावी लागेल -
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातील बॅनरवर जाहिराती दरम्यान महिलेचा फोटो न छापता इतर दोन पुरुष उमेदवारांना सोबत महिला उमेदवारांची फक्त सावलीचा फोटो छापण्यात आला आहे. दुसऱ्या बॅनर वर महिला उमेदवाराचे नाव आहेत. फोटो मात्र त्यांच्या पतीचे असल्याचे समोर आले आल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीचे प्रभारी अधिकारी दिनेश गीते यांच्या निर्दशनात आणून दिले. यावर निवडणुकीत ग्रामपंचायत परिसरात लावण्यात आलेले प्रचार बोर्ड हे परवानगी असल्यानंतर लावावेत. जर परवानगी नुसार प्रचार बोर्ड लावण्यात आले नसतील तर संबंधितांवर कारवाई करावी असे पत्र जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना दिले आहे. ज्या महिला निवडणूकीत उभ्या आहेत, त्यांचा फोटो प्रचार बोर्डवर नसून फक्त नांवा नुसार फोटोची सावली छापली आहे. दुसऱ्या बोर्डवर महिला उमेदवारांच्या नावावर नवऱ्याचे फोटो छापून प्रचार केला जात आहे. याबाबत निवडणूक आयोगाच्या काय नियम आहेत, याबाबत आयोगासोबत चर्चा करून तात्काळ कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया ग्रामपंचायत निवडणूक प्रभारी अधिकारी दिनेश गीते यांनी दिली.