बुलडाणा - जिल्ह्यातील खामगावजवळील जयपूर लांडे गावानजीक असलेल्या शेतात जळालेल्या कापसाच्या गंजीमध्ये वयोवृद्ध दाम्पत्याचे मृतदेह आढळून आले. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. श्रीकृष्ण लांडे (वय 75) व सईबाई लांडे वय 70 असे मृत दाम्पत्याची नावे आहेत. ही आत्महत्या आहे, की अपघात याचा तपास पोलीस सध्या करत आहेत.
जयपूर लांडे गावाजवळ असलेल्या शेतामध्ये श्रीकृष्ण लांडे आणि सईबाई हे वयोवृद्ध दाम्पत्य रोजप्रमाणे गुरुवारीही काम करण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांचा पुतण्या व मुलगा भानुदास लांडे यांनी शोध सुरु केला. दरम्यान शुक्रवारी सकाळी शेतातील कापसाच्या गंजीमध्ये दोघेही जळालेल्या अवस्थेत आढळून आले.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील अंबुलकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. या दाम्पत्याचा कापसाच्या गंजीला आग लागून मृत्यू झाल्याचा अंदाज प्राथमिक तपासात वर्तवण्यात आला आहे. मात्र, त्यांनी आत्महत्या केली, की हा एक अपघात होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.