बुलडाणा - कोरोनाच्या प्राश्वभूमीवर मुंबईत प्रशासन किती सतर्क आहे, हे मुंबईवरून बुलडाण्यापर्यंत चक्क कोरोनाबाधित 8 वर्षीय चिमुकलीने केलेल्या 550 किलोमीटरच्या प्रवासावरून समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे मुबंईच्या जे. जे. रुग्णालयाने या चिमुकलीच्या स्वॅबचे नमुने घेतल्यानंतरही अहवाल येण्याअगोदर सुट्टी दिली.
![बुलडाणा कोरोना अपडेट](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/7199734_lllldl.jpg)
सुट्टी देण्यात आलेल्या कागदापत्रावरून सर जे.जे मार्ग पोलीस ठाण्यातून या चिमुकलीला बुलडाण्याला जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर आई-वडिलांनी तिला खासगी वाहनाने बुलडाण्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे बुधवारी आणले. मात्र, येथे ती आता कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने तिच्या संपर्कात आलेल्या 19 जणांना बुलडाण्याच्या विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
किडनी निकामी झाल्याने मलकापूर पांग्रा येथील 8 वर्षीय चिमुकलीला गेल्या दोन महिन्यांपूर्वी उपचारासाठी मुंबईला जे.जे रुग्णालयात नेले होते. तेथे तिच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, जे.जे रुग्णालयात तिचा कोरोना संदर्भात स्वॅबचा नमुना घेण्यात आला, नियमानुसार तिला कोरोनाचा अहवाल आल्यानंतर सुट्टी देणे अनिवार्य होते. मात्र, रुग्णालय प्रशासनाने अहवाल येण्याच्या आगोदरच तिला सुट्टी दिली. त्यानंतर पोलिसांच्या परवानगीने आई-वडिलांनी तिला खासगी वाहनाने बुलडाण्याच्या सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेरडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर पांग्रा येथे 550 किलोमीटरचा प्रवास करून बुधवारी 13 मे रोजी मध्य रात्री 3 वाजता आणले.
मात्र, आज गुरुवारी ही मुलगी आयसीएमआर (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) च्या पोर्टलवर पॉझिटिव्ह दर्शविण्यात आली आहे. आता चिमुकलीला उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. याची प्रशासनाला माहिती मिळताच प्रशासनाने याची गंभीर दखल घेत कोरोना नोडल अधिकारी डॉक्टर शिवानंद शिंगाडे, ठाणेदार संग्राम पाटील, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, ग्रामविकास अधिकारी उद्धव गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर चाटे पोलीस जमादार नारायण गीते पो.कॉ विशाल बनकर यांनी गावात जाऊन तिला ताब्यात घेतले आणि रुग्णवाहिका बोलवून तिला कोव्हिड रुग्णालयात पाठवले. तिच्या संपर्कात आलेल्या 19 जणांना बुलडाण्याच्या विलगीकरण कक्षात पाठविले आहे. तर मलकापूर पांग्रा येथील कंटेनमेंट झोन सील करण्यात आले असून परिसरात निर्जंतुकीकरण केले.