बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू असताना आता बुलढाण्यातून अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असणाऱ्या दुचाकीने समोर असणाऱ्या वाहनाला मागुन धडक दिली. या अपघातात तीन दुचाकीस्वारांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. हा अपघात मुंबई नागपूर हायवेवर झाला. या अपघातात मरण पावलेल्या तीघांपैकी दोघे सख्खे भाऊ आणि एक चुलत भाऊ आहे. तिघेही मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील रहिवाशी आहेत.
दुचाकीवरील तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू : उमेश विठ्ठल कांढरकर (वय वर्ष 23), प्रशांत किसन कांढरकर (वय वर्ष 23), नितीन किसन कांढरकर (वय वर्ष 26) या तिन सख्ख्या चुलत भावांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मलकापूर तालुक्यातील झोडगा येथून हे तिघेजण दुचाकीने मलकापूरकडुन खामगावकडे जात होते. दरम्यान त्यांच्या दुचाकीने नांदुरा मोताळा रोडवरील राष्ट्रीय महामार्गावरील बायपासवरील उड्डाण पुलावर समोरुन जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला मागुन जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.
टनेने झोडगा गावावर शोककळा : अपघातानंतर तिघांचेही मृतदेह नांदुरा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच आमदार राजेश ऐकडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली. मृतांची ओळख पटविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मृतक हे झोडगा येथील असल्याचे समोर आले. त्यानंतर आमदार राजेश ऐकडे यांनी झोडगा येथे संपर्क साधुन त्यांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती दिली. मात्र या घटनेने झोडगा गावावर शोककळा पसरली आहे.
48 तासांमध्ये सहा जणांचा मृत्यु : एकंदरीत मागील 48 तासांमध्ये दुचाकीच्या अपघातामध्ये सहा जणांचा बुलढाणा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील घडत असलेल्या अपघातांसोबत बुलढाणा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीचे अपघात देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अनियंत्रित वेग मर्यादा, गुळगुळीत झालेले रस्ते तसेच वाहतुक नियमांचे उल्लंघन अशा अनेक कारणांमुळे प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस या घटना घडलेल्या आहेत.
हेही वाचा :