बुलडाणा - बुलडाणा एसटी आगार प्रमुख रवींद्र मोरे यांना चालक ए. एल वाडके नामक चालकाने बुधवारी 10 फेब्रुवारी रोजी सुट्टी का मंजूर करीत नाही. या कारणावरून आगारात मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आगार प्रमुख मोरेंनी बुलडाणा शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत मारहाण करतांना चालक व्यसनाधीन होता, असे नमूद करण्यात आले आहे. यामुळे बुलडाणा आगारात एकच खळबळ उडाली आहे.
अश्लील भाषेत शिवीगाळ-
बुलडाणा एसटी आगार प्रमुख कार्यालयीन कामकाज निमित्त आगाराच्या गेट जवळ संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास वाहक नियंत्रक व सुरक्षा रक्षकांसोबत चर्चा करत होते. दरम्यान या ठिकाणी बुलडाणा येथे कार्यरत असलेले चालक ए.एल. वाडके आले. मी आपल्याकडे सुट्टीचा अर्ज केला आहे. तुम्ही सुट्टी मंजूर का करीत नाही, असे म्हणत त्यांनी आगार प्रमुख मोरे यांच्यासोबत वाद घालून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर मोरे यांची कॉलर धरून मारहाण करत त्यांना खाली पाडले.
पोलिसात तक्रार दाखल-
मारहाण करतांना चालक ए.एल. वाडके हे दारूच्या नशेत असल्याचा आरोप आगार प्रमुख रवींद्र मोरे यांच्याकडून करण्यात आला आहे. झालेल्या प्रकारानंतर रवींद्र मोरे यांनी सामान्य रुग्णालयात आपली वैद्यकीय तपासणी करून बुधवारी रात्री बुलडाणा शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पुढील चौकशी पोलीस करीत असून चालक वाडके सध्या फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा- राज्यपाल विरुद्ध सरकार : राज्यपालांना सरकारी विमान नाकारले