बुलडाणा - बुलडाणा शहरातील सरस्वती नगरात राहणाऱ्या आरटीओ अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या राहत्या घरी चोरी झाल्याची घटना सोमवारी (18 जानेवारी)च्या रात्री घडली असून चोरांनी एकूण 27 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केला आहे. त्याचबरोबर चोरट्यांनी आरटीओ दुतोंडें यांच्या घराशेजारी राहणारे विनायक पाटील यांच्या घरी सुद्धा चोरी केली असून एकूण 29 हजार 500 रुपये मुद्देमाल चोरांनी लंपास केला आहे.
दोन्ही बंद घरे फोडली -
शहरातील सरस्वती नगरमध्ये आरटीओ अधिकारी जयश्री दुतोंडे यांचे घर आहे. त्यांचे घर बंद असल्यामुळे सोमवारी रात्री चोरांनी घरात प्रवेश केला व घरामधून चोरांनी रोख 12 हजार रुपये व 3 ग्राम व 5 ग्रॅम अशा वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या असा एकूण 27 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तसेच त्यांच्याच शेजारी राहणारे विनायक पाटील यांचे घरातही चोरांनी प्रवेश करून नगदी 23 हजार रुपये व चांदीचे देव, दिवा सोनाटा कंपनीचे घड्याळ असा एकूण 29 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. दोन्ही घरात कोणी नसल्याने ही चोरी झाल्याचे समजते.
आरटीओ जयश्री दुतोंडे या अकोला येथे गेल्याने त्यांचे घर बंद होते तसेच विनायक पाटील हे सुद्धा देव दर्शनासाठी गेले असल्याने त्यांचेही घर बंद होते. दोन्ही घरे बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी दोन्ही घरातील मुद्देमाल लंपास केल्याची घटना मंगळवारी 19 जानेवारीला सकाळी उघडकीस आली. यावरून बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार प्रदीप साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजीत आहीराव हे करीत आहेत.