बुलडाणा - सियाचीनमध्ये देशाच्या सीमेवर खडा पहारा देणारा बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीतील एक जवान एक वर्ष कर्तव्याचा कालावधी पूर्ण झाल्यावर बर्फाळ डोंगरावरून पाय घसरल्याने खाली कोसळला. आणि त्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला. वीरमरण आलेल्या जवानाचे कैलास भारत पवार असे नाव आहे.
महार बटालियनमध्ये होते पवार
हिमालयाच्या पर्वतरांगेत असलेल्या सियाचीन ग्लेशियरमधील अंग गोठवून टाकणाऱ्या थंडीत पारा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली असतो. अशा भयानक थंडीमध्ये जवान चीन आणि पाकिस्तानी कारवायांवर नजर ठेवून असतात. वेळप्रसंगी ते युध्दास देखील तयार असतात. या दुर्गम आणि बर्फाच्छादित प्रदेशात चिखली येथील पुंडलिक नगर भागातील रहिवासी कैलास भारत पवार हे गेल्या २ ऑगस्ट २०२० पासून ३ - महार बटालियनमध्ये आपले कर्तव्य चोखपणे बजावत होते.
बर्फाळ डोंगरावरून पाय घसरल्याने झाली घटना
कैलास पवार यांची सियाचीनमधील एक वर्षाची ड्यूटी १ ऑगस्टला संपली. आता ते सहा महिन्यांच्या सुटीवर घरी येणार होते. आपल्या सहकाऱ्यांसह कैलास सियाचीन ग्लेशियरच्या बर्फाळ डोंगरावरून खाली उतरत होते. सियाचिन ग्लेशियर पर्यंत पाठीवर सामानाचे ओझे घेऊन जाणे आणि उतरून परत येणे हा प्रवास जवानांना पायीच करावा लागतो. तेथपर्यंत पोहचायला आणि तेथून खाली यायला प्रत्येकी चार दिवस लागतात ) दरम्यान, खाली उतरत असतांना बर्फाळ डोंगरावरून कैलास यांचा पाय घसरला आणि ते बर्फावरुन घरंगळत खाली कोसळले. सोबत असलेल्या जवानांनी शक्य तेवढे लवकर त्यांना तेथून हलवले आणि उपचारासाठी लडाखच्या इस्पितळात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान १ ऑगस्ट रोजी कैलास पवारची प्राणज्योत मालवली. याची माहिती मिळताच पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वीर मरण आलेल्या जवान कैलास पवार यांच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ आणि धाकटी बहीण असा आप्तपरिवार आहे. त्याच्या पार्थिव मंगळवारी ३ ऑगस्ट रोजी दुपारपर्यंत औरंगाबाद येथे आणणार आहे.दरम्यान बुधवारी ४ ऑगस्ट रोजी चिखली येथील तालुका क्रीडा संकुलात सकाळी ११ वाजता लश्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येईल.
हेही वाचा - Break The Chain : राज्यातील लॉकडाऊन शिथील, मात्र ११ जिल्ह्यात लॉकडाऊनचे नियम कायम