बुलडाणा - उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील घटनेमध्ये आरोपींनी पीडितेसोबत केलेले कृत्य हे क्रौर्याचा कळस गाठणारे आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करता तसेच कुटुंबीयांना न कळवता मध्यरात्री तिचा मृतदेह जाळून टाकणे हे अमानवीय आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेचा सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सदस्य आणि जिल्हा परिषद ॲड. जयश्री शेळके यांच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला.
भविष्यात अशा प्रकारचे अमानवीय, हिंसक, आणि लाजिरवाणे कृत्य करण्याची कुणाची हिंमत होता कामा नये, यासाठी उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराचा गांभिर्याने विचार करुन मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्फत आज गुरुवारी 1 ऑक्टोबर रोजी करण्यात आली.
देशभरामध्ये महिलांवर तसेच लहान मुलींवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामध्ये दिल्लीतील निर्भया, कोपर्डी, कठुआ, उन्नाव, हैदराबाद, हिंगणघाट आणि आता उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील घटनेची दुर्दैवी भर पडली. 2018च्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये दररोज 150पेक्षा जास्त बलात्कार होतात. देशभरात महिलांवरील अशा अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असताना आरोपींच्या शिक्षेस होणारा विलंब ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळेच असे कृत्य करण्याऱ्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांना कायद्याची भीती वाटत नसावी. या घटनेमुळे जनसामान्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण आहे. मात्र, वेळोवेळी फक्त निषेध नोंदवून किंवा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसरख्या पोकळ घोषणा देऊन ह्या घटना थांबणार नाहीत.
महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर सुस्त पडणे आणि बलात्कारासारख्या घटना घडल्यानंतर कायम झोपेचे सोंग घेणे बंद व्हायला हवे. हाथरस येथील घटनेमध्ये आरोपींनी पीडितेसोबत केलेले कृत्य हे क्रौर्याचा कळस गाठणारे आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करता तसेच कुटुंबीयांना न कळवता मध्यरात्री तिचा मृतदेह जाळून टाकणे हे अमानवीय आहे. भविष्यात अशा प्रकारचे अमानवीय, हिंसक, आणि लाजिरवाणे कृत्य करण्याची कुणाची हिंमत होता कामा नये, यासाठी उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराचा गांभीर्याने विचार करून मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी सदस्य आणि जिल्हा परिषद शेळके यांनी केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षकांमार्फत निवेदन देऊन आज गुरुवारी करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'उत्तर नाही तर अत्याचार प्रदेश' : जन्मदात्याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पीडित गर्भवती