बुलडाणा - जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकूण 870 पैकी 527 ग्रामपंचायतीच्या जागेसाठी 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवातही झाली आहे. आज गुरुवारी 24 डिसेंबर रोजी 83 उमेदवारांचे 88 अर्ज दाखल करण्यात आले.
23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ
बुलडाणा जिल्ह्यातील 870 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 527 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. आपापल्या गटातील ग्रामपंचायतींवर आपल्याच गटाचे वर्चस्व राहावे म्हणून जिल्हा परिषद सदस्यही कामाला लागले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील 10 लाख 34 हजार 33 मतदार आहेत. 1771 प्रभागामध्ये ही निवडणूक होत असून यासाठी 1978 मतदान केंद्रे राहणार आहेत. त्यातच 23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला असून, ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापण्यास प्रारंभ झाला आहे. 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. दरम्यान, 23 डिसेंबर आणि आज गुरुवारी 24 डिसेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण 83 उमेदवारांनी 88 अर्ज भरले आहेत.
उमेदवारांना कोरोनाचाचणी अनिवार्य
सध्या कोरोना आजार काळात ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज भरणारे उमेदवार व त्यांच्या साथीदारांना आपापली कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे. कारण जे उमेदवार निवडणुकीत उभे राहणार आहेत, ते उमेदवार आणि त्यांचे साथीदार गावात फिरून प्रचार करणार आहेत. उमेदवारांना कोरोना चाचणी अनिवार्य केल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी सांगितले आहे
ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी आता 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक
या वर्षीच्या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य होण्यासाठी आता सातवा वर्ग उत्तीर्ण असणे आवश्यक झाले आहे. याबाबत 5 मार्च 2020 रोजी अध्यादेश काढण्यात आला आहे. मात्र ही अट 1जानेवारी 1995नंतर जन्मलेल्या व्यक्तींसाठी लागू राहील.