बुलडाणा - संग्रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील 108 अॅम्ब्युल्सवर कार्यरत डॉक्टर गुरुवारी रात्री कोरोनाबाधित असल्याचे उघड झाले. कोरोनाग्रस्त डॉक्टरांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरील 11 कर्मचाऱ्यांपैकी 6 कर्मचारी व संग्रामपूर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांसह डॉक्टरांच्या परिवारातील 6 जण असे एकूण 13 जणांना क्वारंन्टाईन करण्यात आले. त्यांच्या स्वॅबची तपासणी करण्यात येणार आहे.
कोरोनाबाधित डॉक्टर त्यांच्या नातेवाईक महिलांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण झाली. संग्रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील 108 अॅम्ब्युलन्सवर कार्यरत डॉक्टर आपल्या भावाच्या सासूची तब्येत बिघडल्याने त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. त्यावेळी 108 अॅम्ब्युलन्सवर कार्यरत डॉक्टरही अकोला येथे गेले होते. दरम्यान अकोला येथे सदर महिलेचा स्वॅबचा अहवाल कोरोनाबाधित आढळून आला.
डॉक्टरांनीही स्वॅबचे नमुने तपासण्यासाठी पाठविले होते. त्यानंतर डॉक्टरांचा अहवालही गुरुवारी रात्री कोरोनाबाधित म्हणून आल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान संग्रामपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील 11 कर्मचाऱ्यांपैकी 6 कर्मचारी आणि 1 तालुका आरोग्य अधिकारी यांना व त्यांच्या परिवारातील 6 लोकांना असे एकूण 13 जणांना शेगाव येथे क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅबचे नमुने तपासण्यासाठी पाठविण्यात येणार आहेत.