भंडारा - मोहाडी तालुक्यातील आंधळगाव ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाईची मागणी करण्यासाठी आंधळगाव येथील पाण्याच्या टाकीवर चढून एका तरुणाने आंदोलन केले. किरण सातपुते असे त्या आंदोलक तरुणाचे नाव आहे. प्रजासत्ताक दिनी केलेल्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती. 6 तासाच्या प्रयत्नानंतर आणि समजुती नंतर आंदोलनकर्त्या तरुणाला खाली उतरविण्यात प्रशासनाला यश आले आहे.
पाण्याच्या टाकीवर चढून तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन पहाटे 5 वाजता चढला टाकीवरमंगळवारी सर्वत्र सकाळपासून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची तयारी सुरू होती. झेंडावंदनच्या तयारीसाठी लागलेल्या आंधळगाव येथील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना अचानक वेगळ्या तयारीला लागावे लागले. याच वेळी दुसरीकडे आंधळगाव येथील किरण सातपुते या तरुणाने ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, या मागणीला घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंधळगाव येथील पाण्याच्या टाकीवर चढून विरूगिरी पद्धतीने आंदोलन सुरू केले. पहाटे पाच वाजतापासूनच किरण यांनी टाकीवर चढून आंदोलन सुरू केले. या आंदोलनाची माहिती होताच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक आपापल्या चमूसह घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर या आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्याला खाली उतरण्याचे प्रयत्न सुरू झाले.
पाण्याच्या टाकीवर चढून तरुणाचे शोले स्टाईल आंदोलन आंधळगाव येथील सरपंचावर भ्रष्टाचार केल्याचा आरोपआंधळगाव येथील रोजगार हमी योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. तसेच गणेश बांडेबुचे या व्यक्तीच्या नावे स्वतःची मालकीची जागा नसतानाही त्यांना जनावराचा कोटा मंजूर करण्यात आलेला आहे. व्हॅलिडीटी नसतानाही कोष्टी समाजाचे चार लोकं या ग्रामपंचायतीमध्ये पदावर कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीने पाच लाखांचे गार्डन बांधले आहे. मात्र ते फक्त कागदोपत्रीच अस्तित्वातच आहे. ग्रामपंचायतीच्या इमारतीचे नूतनीकरण झाले, हे नूतनीकरण होतांना भ्रष्टाचार झाला असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. या इमारतीच्या कामासाठी खोट्या मजुरांच्या नोंदी दाखवून मजुरी उचलली गेली असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच. इमारतीमध्ये लावलेल्या विद्युत फिटिंग मध्ये जवळपास 3.8 लाखांचा घोटाळा केल्याचा आरोप आंदोलक तरुणाने केला आहे.
यापूर्वीही केले होते आंदोलन-या भ्रष्टाचाराला घेऊन किरण सातपुते यांनी याअगोदरही वेगवेगळी आंदोलने केली होती. मात्र प्रत्येक वेळेस चौकशी करू असे सांगून त्यांचे आंदोलन संपविण्यात आले. मात्र मंगळवारी पाण्याच्या टाकीवर चढल्यानंतर किरण यांची पुन्हा समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू झाला. किरण यांना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावकरी जमले होते. तब्बल सहा तासानंतर किरण यांनी माघार घेत पाण्याच्या टाकी वरून खाली उतरण्याची भूमिका घेतली. मात्र ही शेवटची वेळ असून या भ्रष्टाचाराची लवकरच चौकशी लागली नाही तर यानंतर आत्मदहन करेल आणि तेव्हा कुठल्याही अधिकार्यांचा ऐकणार नाही, असा धमकीवजा इशारा किरण यांनी यावेळी दिला आहे.