भंडारा - राज्यात सध्या 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे अभियान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील अनेक शाळांचे विद्यार्थी रस्त्यावर आलेले दिसले. हातात कुंचला आणि रंगाचे डबे घेऊन भिंती रंगविण्यात व्यस्त दिसणारे हे विद्यार्थी मनोरंजन म्हणून नव्हे, तर समाजाला दिशा देण्यासाठी कुंचल्याचा वापर करत होते.
कोरोना काळात काय काळजी घेतली पाहिजे, याची माहिती देणारी चित्र शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, पटेल महाविद्यालय आणि नगरपालिकेच्या पाणी टाकी परिसरातील भिंतीवर रेखाटण्यात येत आहेत. अत्यंत तन्मयतेने चित्र काढणाऱ्या या विद्यार्थ्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र आता त्या चित्रातील मर्म ओळखून तो संदेश कितपत आत्मसात केला जातो, यावर विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमाचे सार्थक अवलंबून आहे.