भंडारा - जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये कार्यरत असलेले अस्थिरोग तज्ञ डॉक्टर अतुल टेंभुर्णे यांनी एका 22 वर्षीय तरुणाला जगण्यासाठी एक नवीन उमेद निर्माण केली आहे. सिकलसेल एसएस या गंभीर आजाराने ग्रासलेल्या या तरुणाचे दोन्ही पाय निकामी झाले होते. मात्र दोन्ही खुब्यांच्या सांध्यांचे प्रत्यारोपण ( हिप्स रिप्लेसमेंट) ही शस्त्रक्रिया करून या तरुणाच्या पायांना नवे बळ दिले आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयात अडीच ते तीन लाख रुपये खर्च येणारी ही शस्त्रक्रिया भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये अगदी मोफत करण्यात आलेली आहे. किचकट आणि खर्चिक वाटणाऱ्या शस्त्रक्रिया आता जिल्हा सामान्य रुग्णालयात होऊ लागल्याने गरीब आणि ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक विवंचनेमुळे वैद्यकीय सेवेपासून वंचित राहावे लागणार नाही.
- सिकलसेल आजारामुळे पाय झाले निकामी
भंडारा जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या लाखांदूर तालुक्यातील अभय शेंडे या 22 वर्षीय तरुणाला सिकलसेल एसीएस पद्धतीचा आजार झाला होता. आजार अतिशय गंभीर आहे. या आजारामध्ये शरीरामध्ये रक्त रक्तपुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे दर महिन्याला अशा रुग्णांना रक्त द्यावा लागते. अभयाच्या शरीरातही रक्तपुरवठा होत नसल्यामुळे त्याचे सांधे निकामी म्हणजे मृत होऊन या तरुणाला अपंगत्व आले होते. त्याचे पाय एखाद्या कात्री प्रमाणे वाकले होते. चालतानाही तो तशाच पद्धतीने पाय घासून पुढे पुढे स्वतःला नेत असे.
- डॉक्टरांनी केली शस्त्रक्रिया
अभय याला मागील वर्षभरापासून चालणे आणि बसणे कठीण होत होते. मात्र वडील शेतमजूर असल्याने पैशांच्या अभावी कधीही त्यांनी त्याच्या उपचारावर लक्ष दिला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे सिकलसेलच्या उपचार घेण्यासाठी आले असता त्यांची भेट डॉक्टर अतुल टेंभुर्णे यांच्याशी झाली. डॉक्टर टेंभुर्णे यांनी अभयला विश्वास दिला त्याचे दोन्ही पाय ते व्यवस्थित करतील आणि त्याला पुन्हा चालता येईल. त्या तरूणाला अव्यास्कुलर नेक्रोसिस ऑफ हेड म्हणजे खुब्याचे सांधे मृत झाल्याचा आजार झाला होता. यावर उपाय म्हणजे हे सांधे बदलून कृत्रिम सांधे बसविणे हाच एकमेव उपाय होता. या दोन्ही सांध्यांच्या शस्त्रक्रियांसाठी खासगी रुग्णालयात कदाचित तीन लाख रुपयांपर्यंत खर्च आला असता. तर शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रिया करताना सांधे रुग्णाला खरेदी करून आणावे लागत होते. पण डॉक्टर टेंभुर्णे यांनी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेतून या सांध्यांचे खर्च करत संपूर्ण शस्त्रक्रिया मोफत केली. अभयला सिकलसेल असल्याने ही शस्त्रक्रिया अजूनच जटिल आणि जिवावर बेतणारी होती. त्यातच मागील वर्षभरापासून त्याच्या पायाची हालचाल थांबली होती त्यामुळे त्याचे स्नायू सुद्धा ताणले गेले होते. शस्त्रक्रिया करावी की नाही असा प्रश्न त्यांच्या समोर होता. प्रथम त्याच्या स्नायूंवर शस्त्रक्रिया करावी लागली. नंतर डॉक्टर टेंभुर्णे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील त्यांच्या इतर डॉक्टर चमूने मिळून अभयच्या एका सांध्यांचे यशस्वी शत्रक्रिया पार पडली. त्यामुळे तो चालायला लागला. पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर नुकतीच त्याच्यावर दुसरी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. महिन्याभरात तो त्याच्या दोन्ही पायाने व्यवस्थित चालू शकेल, असे डॉक्टर अतुल यांनी सांगितले.
- अभय आणि त्याच्या वडिलांना आनंद
जिल्हा सामान्य रुग्णालय हे अभयच्या जीवनात एक आशेची किरण निर्माण करणारा ठरला आहे. अभयने स्वतःच्या पायावर चालण्याची आशाच सोडून दिली होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर त्याला चालता येते. यावर त्याचा विश्वास बसत नाही. एकही पैसे खर्च न करता मला चालता येते. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, असे अभयने सांगितले. पैसे नसल्यामुळे मुलाचे हाल होत असतानाही मी काहीच करू शकत नव्हतो. डॉक्टरांनी चमत्कार करून दाखविला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, अशी प्रतिक्रिया अभयच्या वडिलांनी दिली आहे.
हेही वाचा - Aurangabad RTO : वाहन चालकांनो सावधान, मास्क घातला नाही तर दंडाची पावती येईल घरी