भंडारा - मागील पाच वर्षांच्या काळात साकोली मतदारसंघात झालेल्या विकासाबाबत जनतेच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत. तसेच आमदार बाळा काशिवार यांनी केलेल्या विकासकामांच्या दाव्यात तथ्य किती, हे नागरिकांच्या नजरेतून पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत 'ईटीव्ही भारत'ने चर्चा केली आहे. यावेळी नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.
साकोली विधानसभा मतदारसंघ हा 2014 पर्यंत सलग 15 वर्षे काँग्रेसकडे होता, मात्र 2014 मध्ये भाजपचे बाळा काशिवार हे येथून निवडून आले. गेल्या 5 वर्षांतत त्यांनी शेतकरी, रोजगार, या मूलभूत गरजेच्या दृष्टीने कोणती ठोस पाऊले उचलली, विशेष म्हणजे भेल प्रकल्प मागील 5 वर्षांत का पूर्ण होऊ शकला नाही, हे लोकांनी विचारले आहे.
हेही वाचा... 'कमळ' हाती घेता घेता, आमदार भारत भालकेंनी हातात बांधले 'घड्याळ'
शेतीसाठी भाजप सरकारने 500 रुपयांचा बोनस दिला, तर धानाला (तांदुळ) 1800 रुपये दर दिले. खतांचे दर कमी केले, त्यामुळे आम्ही शेतकरी खूश आहोत, असे काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे. तर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर 500 बोनस दिला, जर शासनाला बोनस द्यायचाच होता, तर अगोदरच द्यायला हवा होता. हे मतांसाठी दिलेले प्रलोभन आहे, असेही मत काहींनी मांडले.
सध्या साकोलीमध्ये उड्डाण पुलाची निर्मिती होत आहे. या पुलामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. तर या पूल निर्मितीत काम करणारे अभियंते, कामगार हे सर्व उत्तर प्रदेश, बिहारवरून आणण्यात आले असल्याचे सांगत, आमच्या साकोली किंवा जिल्ह्यात अभियंते किंवा कामगार नाहीत, असा संतप्त सवालही काही नागरिकांकडून करण्यात आला.
हेही वाचा... मी महाराष्ट्र बोलतोय : रत्नागिरी जिल्ह्यातील तरुणाईला जिल्ह्यातच हवाय रोजगार
जीएसटी आणि नोटबंदीमुळे आमचे केवळ नुकसान झाले. नोटबंदीमध्ये 99 टक्के तर पैसे परत आले. मग त्याचा फायदा काहीच झाला नाही. उलट जीएसटीमुळे तर व्यापार बरबाद झाला आहे, अशी भावना काही नागरिकांनी बोलून दाखविली. मागच्या 5 वर्षांच्या काळात रस्त्यांचे जाळे सर्वत्र पसरविले गेले. जे आजपर्यंत कधीच झाले नव्हते, असे काही नागरिकांचे मत होते. ओबीसी नेत्याला डावलण्याचे काम भाजपने केले असून नाना पटोले यांच्या कार्यकाळात भेल प्रकल्प पूर्ण झाला असता, तर प्रस्थापितांना त्याचा धक्का लागला असता, त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होऊ दिला गेला नाही, अशी टीका वजाआरोपही काही नागरिकांनी केला आहे.
हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय : औरंगाबादचे नवमतदार म्हणतायत, 'निवडणूक ही मूलभूत प्रश्नांवर व्हावी'