भंडारा - जिल्ह्यासाठी २०१३ मध्ये मंजूर झालेल्या १०० खाटांच्या महिला रुग्णालयाला जागा मिळाली आहे. शुक्रवारी (२४ ऑगस्ट) पालकमंत्री परिणय फुके यांच्या हस्ते याचे भूमिपूजन करण्यात आले.
रुग्णालय उभारणीचे काम २५ तारखेला सुरू होऊन पुढील २ वर्षात हे रुग्णालय पूर्णपणे बांधून रुग्णांच्या सेवेत तत्पर होईल, अशी माहिती फुके यांनी दिली. भूमिपूजनाच्या या कार्यक्रमादरम्यान भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या मृत्युची बातमी आल्यानंतर सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
शिवसेनेचे २०१३ मधील तत्कालीन आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा जिल्ह्यासाठी १०० खाटांचे रुग्णालय मंजूर करुन आणले होते. नंतर २०१४ मध्ये त्यांचा पराभव झाला आणि त्यानंतर हा रुग्णालयाचा प्रस्ताव गुंडाळून ठेवण्यात आला होता. हे रुग्णालय व्हावे, यासाठी वेळोवेळी आंदोलने झाली. मात्र, रुग्णालयासाठी जमीन मिळत नव्हती. वर्षभरापूर्वी या रुग्णालयासाठी सामान्य रुग्णालय समोरील जागा मंजूर झाली. पण सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वर्षभराचा कालावधीत लागला.
रुग्णालयासाठी पैसे आणल्याचा आणि जागा मिळवून दिल्याचे श्रेय घेण्यासाठी नरेंद्र भोंडेकर आणि परिणय फुके यांच्यातर्फे मोठ-मोठे बॅनर लावण्यात आले होते. एवढेच नाही तर भोंडेकर यांनी तीनदा महिला रुग्णालयाच्या नावाखाली भूमिपूजनही केले होते. मात्र, आज शासकीयरित्या झालेल्या भूमिपूजनाच्या वेळेस नरेंद्र भोंडेकर हे अनुपस्थित होते.
दरम्यान, अकरा वाजता सुरू होणारा कार्यक्रम दुपारी २ वाजता सुरू झाला. भाजपच्या महिला कार्यकर्त्यांकडून पूजन करुन विधिवत भूमिपूजन फुके यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात भाजपचे माझी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांना सर्वांनी २ मिनिटे शांत राहून श्रद्धांजली वाहिली.
महिलांसाठीही विशेष रुग्णालय झाल्यानंतर ज्या महिलांना बरेचदा खासगी रुग्णालयात किंवा नागपूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी जावे लागत होते. त्यांचे उपचार आता भंडाऱ्यात शक्य होईल, असे मत जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाईत यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम पूर्वनियोजित असल्यामुळे बरेच नागरिक येथे आले होते. त्यामुळे हा भूमिपूजनाचा कार्यक्रम आम्ही रद्द केला नाही. महिलांसाठी अतिशय महत्वाचे ठरणारे हे रुग्णालय उभे करुन खऱ्या अर्थाने जेटली यांनी आम्ही खरी श्रद्धांजली देणार आहोत. रविवारपासून रुग्णालयाच्या बांधकामाला सुरुवात होऊन पुढच्या २ वर्षात रुग्णालय पूर्ण होईल आणि लवकरच आम्ही इमारतीच्या उद्घाटनासाठी पण येऊ, असे पालकमंत्री फुके यांनी सांगितले.