भंडारा - खरीप हंगामातील बोनसचे पैसे मिळावे. या मागणीसाठी विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात जिल्हा पणन अधिकारी यांच्या कार्यालयावर ताला ठोको आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश लागू असताना या आंदोलनाला मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. यावेळी आंदोलक हे सर्व कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसून आले. तसेच या आंदोलनासाठी प्रत्येकी दीडशे रुपये मजुरीवर आणल्याचेही काही आंदोलक महिलांनी यावेळी सांगितले.
जिल्हा पणन आधिकाऱ्याच्या कार्यालयाला लावले कुलूप -
मागील एक वर्षापासून शेतकऱ्यांना खरीप हंगामातील धान पिकावरील बोनस हे देण्यात आलेले नाही. हे बोनसचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळावे. या मागणीसाठी विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात जिल्हा पणन कार्यालयावर ताला ठोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्खेने कार्यकर्ते घेऊन जिल्हा पणन आधिकाऱ्याच्या कार्यालयाला त्यांनी कुलूप लावले आहे. यावेळी आंदोलकांनी मात्र कोरोना नियमांचा फज्जा उडवला होता.
नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच का? -
भंडाऱ्यात अलिकडेच 50 पेक्षा जास्त निमंत्रित लग्नाला आल्याने सभागृहांवर कारवाई करण्यात आली होती. यात काही सभागृह सीलही करण्यात आले. तर दुसरीकडे परिणय फुके यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात शेकडो लोक एकत्रित आले होते. यावेळी कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आल्याचे चित्र बघायला मिळाले. त्यामुळे नियम फक्त सामान्यांसाठीचा आहे का असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकाऱ्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.
150 रुपये मजुरीने आणले मजूर
या आंदोलनात सहभागी होण्यासाठी दीडशे रूपये रोजंदारीने आणले गेल्याचे काही महिला आंदोलकांनी यावेळी सांगितले. त्यामुळे यावरही वेगवेगळ्या चर्चा होताना दिसत आहेत.