भंडारा - गडचिरोली येथे नक्षली हल्ल्यात वीरमरण आलेले जवान दयानंद शहारे यांच्यावर गुरुवारी दिघोरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार केलेल्या ठिकाणी नियोजनाचा अभाव दिसला. अंत्यसंस्कारासाठीचे सरण अंधारातच रचण्यात आले. मात्र, तहसीलदारांनी सर्व व्यवस्था केल्याचे सांगितले. वीरमरण आलेल्या जवानाच्या पार्थिवाचे अपमान करू पाहणाऱ्या तहसीलदारावर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली.
बुधवारी गडचोरीलीत नक्षली हल्ला झाला. यामध्ये भंडारा जिल्ह्याचे तीन जवानांना वीरमरण आले. या जवानांचे पार्थिव गुरुवारी संध्याकाळपर्यंत त्यांच्या गावी आणून त्यांच्यावर रात्री अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. लाखनी आणि साकोली येथील तहसीलदारांनी नदीवर तशी व्यवस्था केली होती.
अंत्यसंस्कार करण्यात येणाऱ्या चुलबंद नदी परिसरात अंधार पसरला होता. यामुळे लोकांनाच्या मोबाईल टॉर्चचा आधार घ्यावा लागला. याच मोबाईल टॉर्चच्या प्रकाशात सरण रचण्यात आले. दयानंद यांचे पार्थिव नदी तीरावर पोहोचल्यानंतर अंतयात्रेसह आणलेल्या गाडीतील जनरेटरवरुन विजेचे तीन दिवे सुरु करण्यात आले. या दिव्यांचा प्रकाश हा अंतविधी आणि सलामीच्या जागी पोहोचत नव्हता. शेवटी प्रयत्नाने एक विजेचा दिवा अंत्यविधीच्या ठिकाणी आणण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी सलामी दिली, आणि दयानंद यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात आला.