भंडारा - गुरुवारी भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून फक्त रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे पावसाची सरासरी फक्त 86 टक्के होती. आज (गुरुवार) गोसीखुर्द धरणाची एकोणवीस दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले. यामधून 2108 क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यात या कालावधीत रिमझिम पाऊस बरसत राहिला. दररोज ढग दाटून येत होते. मात्र, पाऊस बरसत नव्हता. बुधवारी सायंकाळी मात्र वातावरणात पूर्णपणे बदल झाला. सर्वदूर काळे ढग दाटून आले आणि त्यानंतर विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसला.
हेही वाचा - सीमा तपासणी नाक्यावर रुग्णवाहिका अडवून ठेवल्याने उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू
या पावसाचा वेग एवढा जास्त होता की, बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचले. घरातील विहिरी ओवरफ्लो झाल्या. छोटे नदी-नाले देखील भरून वाहू लागले. खरे तर बऱ्याच कालावधीनंतर असा पाऊस आल्यामुळे नागरिक आणि शेतकरी आनंदीत आहेत. 1 जुन ते 20 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील पावसाची सरासरी 905 मिलिमीटर एवढी असते.
मात्र, यावर्षी केवळ 476 मिलिमीटर पाऊस बरसला आहे. बुधवारी गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 19 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले असून यामधून 2108 क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे. सायंकाळी बरसलेल्या मुसळधार पावसानंतर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास धरणाचे इतर दरवाजे उघडण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.