भंडारा - शेतातील कालव्याजवळ सापडलेल्या अस्वलाच्या पिल्ल्याला भंडारा वनपरिक्षेत्राच्या कर्मच्याऱ्यांचा मदतीने जीवदान मिळाले. इतकेच नव्हे तर, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने पिल्लाची त्याच्या आईशी भेटही घडली.
भंडारा वनपरिक्षेत्र मौजा सितेपार येथे रस्त्याच्या कडेला शेतातील कालव्याच्या पाइपमध्ये अस्वलाने पिलाला जन्म दिला होता. परंतु, अवकाळी पावसामुळे कालव्यात पाणी साचल्याने या पिल्लाची आई सोबत नसताना हे पिल्लू पाईपच्या बाहेर पडले. त्यामुळे, ते लोकांना दिसले तेव्हा लोकांनी तिथे प्रचंड गर्दी केली. अस्वली परत आल्यावर आपल्या पिल्लाजवळ लोकं जमलेले बघून ती त्यांच्या अंगावर धावून गेली. तेव्हा लोकांनी आरडाओरड केली असता अस्वली तिच्या पिल्लाला तिथेच सोडून जंगलाच्या दिशेने पळून गेली. स्थानिक लोकांनी याबाबत माहिती भंडारा वनपरिक्षेत्र कार्यालयाला दिली. भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी व भंडारा रैपिड रेस्क्यू यूनिटचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले असता, त्यांना अस्वलीचे पिल्लू तिथेच आढळले.
कर्मचाऱ्यांनी सर्व जमावाला दूर करून पिल्लाला ताब्यात घेतले व आजूबाजूला तपासणी केली. परंतु, तिथे अस्वल आढळले नाही तसेच, अस्वलीचे पिल्लू ओले होऊन थंडीने कुडकुडत होते. त्यामुळे, त्याला वनपरिक्षेत्र कार्यालय भंडारा येथे नेण्यात आले. तिथे त्याला उबदार कपड्यात ठेवून त्याला बाटलीच्या साहाय्याने दूध पाजण्यात आले. पिल्लू भूकेजून गेले असल्याने त्याने दूध घेतल्यावर शांत झाले. यानंतर, संध्याकाळी त्याला ज्या ठिकाणावरून उचलले होते त्याच ठिकाणी परत सोडण्याकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी भंडारा व आरआरयू टीम भंडारा सहित कर्मचारी गेले.
हेही वाचा - भंडाऱ्यात ओबीसींचा मोर्चा; ओबीसी जातिनिहाय जनगणनेची मागणी
या पिल्लाला कालव्याजवळ ठेवून, शासकीय वाहनात बसून सुरक्षित अंतरावरून वनाधिकारी व आरआरयू टीम सदर दृश्यावर नजर ठेवून होते. दरम्यान पिल्लू ओरडू लागल्याने आणि काही वेळातच जंगलाकडून एक मादी अस्वल चित्कारत धावत पिल्लाकडे आले. तिने तिच्या पिल्लाला उचलले परत जंगलाच्या दिशेने निघून गेली. वनाधिकारी व आरआरयू टीमने मादी अस्वल व पिल्लाची पुन्हा भेट घडवून आणल्यानंतर समाधान व्यक्त करत घटनास्थळ सोडले.
हेही वाचा - आमदार भोंडेकर यांचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी कक्षाला टाळे ठोको आंदोलन