भंडारा - शेताची मशागत करत असताना 18 अंड्यांसाह एक नागीण आढळून आल्याची घटना अड्याळ जवळच्या उमरी परिसरात घडली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सर्पमित्राने धाव घेऊन त्या नागिणीला अंड्यासह ताब्यात घेतले. त्यानंतर तिची जंगलात मुक्तता करण्यात आली तर तिची अंडी वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. या अंड्यातून पुढच्या 15 दिवसानंतर पिल्ले बाहेर येतील असा अंदाज आहे.
अडयाळ पासून 5 किमी अंतरावर उमरी या गावात प्रदीप रोहणकर यांच्या शेतात खरीपाच्या तयारीसाठी मशागतीचे काम सुरू होते. त्यावेळी रोहणकर यांनी मशागतीला अडसर ठरणारा एक लाकडाचा मोठा ओंडका बाजूला केला. मात्र, ओंडका बाजूला सारताच एक विषारी नागीण फणा काढूण मोठ्याने फुसकारू लागली. निरीक्षण करून पाहिले असता, त्या ठिकाणी तिची अंडीही आढळून आली. नागिणीला पाहताच तिथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांनाच घाम फुटला. शिवाय या नागिणीची माहिती मिळताच बघ्यांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दरम्यान, शेतीची मशागत पुढे चालू ठेवण्यासाठी ती नागीण त्या ठिकाणाहून हटवणे गरजेचे होते. त्यामुळे शेत मालकाने तत्काळ परिसरातील सर्पमित्राशी संपर्क साधला. शेतात सर्पमित्र दाखल होत त्यांनी नागिणीला मोठ्या शिताफिने पकडून तिला जंगलात सोडून दिले. शिवाय या 18 अंड्यांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. त्या अंड्यांना उबवून 15 दिवसांनी सापाची पिल्ले बाहेर येणार असल्याची माहिती देण्यात आली असुन त्यांनाही जंगलात सोडण्यात येणार आहे.