भंडारा - हिंदू प्रथेनुसार तुळशी विवाहानंतरच (Tulsi Vivaah) खऱ्या अर्थाने लग्नांना सुरुवात होते. त्यामुळे हिंदू धर्मातील प्रत्येक व्यक्ती तुळशी विवाहाला महत्त्व देतो. सुरुवातीच्या काळात तुळशी विवाह हा प्रत्येक घरी साजरा केला जात होता. मात्र, आधुनिक युगात या तुळशी विवाहाचे स्वरूप बदलून सामूहिक तुळशी विवाह प्रकार सुरू झालेला आहे. अश्या सामूहिक तुळशी विवाहच्या माध्यमातून वेळेची बचत होते. सर्वधर्मीय लोक एकत्रित येतात आणि विशेष म्हणजे शेजार धर्माचा पालन होऊन शेजाऱ्यांशी एकोपा निर्माण होतो. कोरोनाने तर नागरिकांना जगण्याचे नवी पद्धत शिकविली आहे. पैशापेक्षा माणसं महत्त्वाची हा मूलमंत्र या कोरोनाने दिलेला आहे. त्यामुळे सामूहिक तुळशी विवाह ही काळाची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केला आहे.
गोदावरी नगरमध्ये सामूहिक विवाह सोहळा -
भंडारा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या बेला येथे मोठ्या प्रमाणात नवीन घरे बनवत आहेत. असाच एक गोदावरी नगरमध्ये अठरा नवीन रो हाऊस बनलेले आहेत. या रो हाऊसमध्ये प्रत्येक जाती धर्माचे लोक राहतात. आजच्या धावत्या युगात या सर्वांना एकत्रित येऊन सुख दुःख जाणून घेण्याचीही वेळ नसते. त्यातच कोरोना काळात प्रत्येकाला आलेला अनुभव हा वेगळाच, पैशांपेक्षा धावून येणारा शेजारी महत्त्वाचा हे कोरोनाने शिकविले आहे आणि त्यामुळेच या गोदावरी नगरातील लोकांनी सामूहिक तुळशी विवाह सोहळा साजरा करण्याचे ठरविले.
स्नेह भोजनाचीही व्यवस्था -
सुरवातीच्या काळात प्रत्येक घरी जाऊन तुळशी विवाह साजरा केला जात असे. तेव्हा असणारी एकत्र कुटुंब पद्धती आणि लोकांकडे असलेला पुरेसा वेळ त्यामुळे तुळशी विवाह हा प्रत्येक घरी साजरा होत असे. मात्र आजच्या धावत्या युगात वेळेची कमतरता, एकल कुटुंब, या सर्व गोष्टींचा विचार करून सामूहिक तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन केले गेले. सर्व घरच्या तुळशी एकाच मंडपात आणून त्या तुळशीना रंगरंगोटी करून त्यांची पूजा केली गेली. बच्चेकंपनीसाठी डीजे तर मोठ्यांसाठी पंजाबी ढोल आणले गेले. अगदी नाचत- गाजत परिसरातून तुळशीची मिरवणूकही काढण्यात आली आणि त्यानंतर डीजे च्या आवाजात सामूहिकरित्या तुळशी विवाह पार पाडण्यात आला आणि मग ठरल्याप्रमाणे लग्नानंतर सर्वांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती.
सामूहिक तुळशी विवाह काळाची गरज -
सामूहिक तुळशी विवाह साजरा करताना आम्ही सर्व लोक एकत्रित येतो. यात जाती धर्माचा भेदभाव पाडला जात नाही. बच्चेकंपनीपासून तर वयोवृद्ध सर्वजण यामध्ये येतात. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून वेळेची बचत होते आणि शेजाऱ्यांमधील संबंध अजून घट्ट होतात. कोरोना काळात शेजारी किती महत्त्वाचे आहेत. हे प्रत्येकाला उमजले आहेत. त्यामुळे आजच्या या युगात सर्व परिसरात किंबहुना सर्वच ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे पार पडावे, हीच काळाची गरज असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे.
हेही वाचा - धक्कादायक! गर्लफ्रेंडच्या वादातून अल्पवयीन मुलांमध्ये राडा; एकाच्या मांडीत खुपसला चाकू