भंडारा - जिल्ह्यतील तुमसर तालुक्यात दुसऱ्यांदा टोळधाड आली आहे. मात्र, या टोळधाडीचा 80 ते 85 टक्के नायनाटकरून उर्वरित किड्यांना पळवून लावण्यात कृषी विभागाला यश मिळाले. कृषी विभाग आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी या किडीला ड्रोन आणि फायर ब्रिगेडच्या माध्यमातून पळवून लावण्याचे नियोजन केले होते.
या अगोदर तुमसर तालुक्यातच 28 मेला टोळधाड आली होती. तेव्हा कृषी विभागाने योग्य नियोजन करून औषधीच्या माध्यमातून टोळधाड मारली होती आणि उर्वरित जिल्ह्याच्या बाहेर पळवून लावली होती. गुरुवारी पुन्हा नागपुरच्या बाजून टोळधाडीने भंडारा जिल्ह्यात प्रवेश केला. एक तासानंतर ती परतून नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यात विसावली. आज पुन्हा ही कीड तुमसर तालुक्यातील सालई (बु.) या गावात पोहोचली. याची माहिती मिळतात भंडारा कृषी विभागाची टीम आणि पंजाबराव देशमुख कृषी विभागाचे अधिकारी सालई (बु.) येथे पोहोचले.
या किडींना मारण्यासाठी 10 एमएल डेल्टामेट्रिन 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून तर २४० एमएल क्लोरोफॉरिफॉस्ट दहा लिटर पाण्यात मिळून त्याची ड्रोनद्वारे आणि अग्निशामक दलाच्या गाडीद्वारे फवारणी केली गेली. रात्रभर ही फवारणी सुरू राहिली. सकाळी दहा वाजेपर्यंत जवळपास 80 टक्के टोळधाड मारण्यात यश मिळाले असून उर्वरित टोळधाड ही गोंदियाच्या दिशेने गेली आहे. विशेष म्हणजे या अगोदर टोळधाड ही कधीही कडुलिंबाच्या झाडावर पाहिली गेली नव्हती. मात्र, यावेळी पहिल्यांदाच 80 टक्के टोळधाड कडुलिंबाच्याच्या झाडावर पहायला मिळाली असे, कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
दक्षिण आफ्रिकेवरून पाकिस्तानच्या दिशेने भारतात प्रवेश केलेल्या या टोळधाडीने आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. सध्या काही ठिकाणी भाताची परे लावली गेली आहेत. ही परे मोठी झाल्यावर किंवा भाताची लागवड झाल्यावर ही कीड परत आल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तुमच्या परिसरात कुठेही टोळधाळ दिसल्यास त्वरीत कृषी विभागाला त्याची माहिती द्यावी, अशी सूचना कृषी विभागाने दिली आहे.