भंडारा - मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ट्विटरवर नेहमी टिवटिव करणारे नेते आता गेले कुठे गेले असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे. तसेच पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यानंतरदेखील हे नेते शांत कसे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर नाना पटोले पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांचे फूल-हार घालून, फटाके फोडून स्वागत केले.
भाजपा विरोधात मोर्चा काढणार
मोदी सरकार सत्तेत आल्यापासून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात दररोज वाढ केली जात आहे. सध्या पेट्रोल प्रति लिटर 96 रुपये तर डिझेल 86 रुपये लिटर झाले आहे. भाजपा हे हुकूमशाही शासन असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे डिझेलची किंमत कमी असूनही भारतामध्ये मात्र पेट्रोल हा शंभर लिटरच्या वर गेला आहे, एवढेच नाही तर शेतकरी मागच्या तीन महिन्यांपासून आंदोलन करतात तरीही केंद्र सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशा या हुकूमशाही भाजपाच्या विरोधात भंडारा जिल्ह्यात काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे, असे त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
टिवटिव करणारे अभिनेते आता कुठे गेले?
काँग्रेस सत्तेवर असताना मनमोहन सिंग हे प्रधानमंत्री असताना अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार हे सतत ट्विटरवर त्यांच्याविरोधात लिहित असत, मात्र सातत्याने ट्विटरवर टिवटिव करणारे हे अभिनेते आता कुठे गेले, महाराष्ट्रात यांनी त्यांच्या सिनेमा आणि शूटिंगवर आणि बंदी आणणार आहोत, अशी भूमिका काँग्रेसने घेतली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.