भंडारा - अतिशय प्राचीन आणि 3 हजार वर्षांपूर्वीची 21 फूट लांब महाचीर (वृतसमाधी) भंडारा जिल्ह्यात सापडली आहे. तसेच महापाषाण युगातील पुरातत्वीय अवशेष आढळून आले आहेत. ही महाचीर भारतातील सर्वात मोठी असल्याची शक्यता आहे. 21 फूट लांब दगड (महाचीर) मधून तुटला असल्याने पुरातत्त्व विभागाच्या मदतीने त्याची देखभाल व दुरुस्ती सुरू आहे. गावकऱ्यांनीही पुरातत्व विभागाला दुरूस्ती कामात मदत करण्यास सुरुवात केली आहे. महाचीर दगड कडू लिंबाच्या झाडाला समांतर उभा असून बलदेव बाबा म्हणून गावकरी त्याचे पूजन करायचे.
पवनी तालुक्यातील विरली (खंदार) गावात हजारो वर्षे जुना 21 फूट लांब दगड होता. कडू लिंबाच्या झाडाच्या बुंध्याला लागून हा दगड असून जमिनीच्या सहा फूट खाली आणि 14 फूट वर दगड आहे. मात्र, कडूलिंबाच्या झाडावर पिंपळाचे झाड उगवले आणि या झाडाच्या मुळ्या या दगडाच्या आत शिरल्या आणि त्यामुळे वर्षानुवर्षे उभ्या असलेला या दगडाच्या जमिनीच्या वरच्या भागापासून भेगा पडल्या. हे लक्षात येताच गावकऱ्यांनी दोराच्या साह्याने त्या दगडाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही दगड खाली पडण्याची शक्यता असल्याने याविषयीची माहिती जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत पुरातत्त्व विभागाला देण्यात आली. पुरातत्त्व विभागाने लगेच त्याची दखल घेऊन विरली गावात येऊन त्याच्या संगोपनाचे काम सुरू केले.
हेही वाचा - काम न करता शासकीय निधी लाटणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करणार - अजित पवार
नागपूर येथून आलेल्या पुरातत्व विभागाच्या पथकाने याची संपूर्ण तपासणी केल्यानंतर सांगितले की, हा जवळपास तीन हजार वर्षांपूर्वीचा दगड असून त्या काळातील एखाद्या महत्त्वपूर्ण व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या समाधीवर या दगडाची स्थापना केली गेली असावी. तसेच या समाधी भोवती तीस फूट अंतरावर दहा ते पंधरा दगडे ठेवण्यात आले आहेत.
हा दगड जमिनीपासून अर्धवट वाकलेल्या अवस्थेत असल्याने पुरातत्व विभागाने त्याच्या सभोवताली खोदकाम करून त्या दगडाला कुठलीही हानी होणार नाही, याची काळजी घेतली. त्याला त्या जागेवरून काढून दुसऱ्या जागेवर जमिनीवर ठेवले आहे. पुढच्या काही दिवसात 21 फुटी दगड जोडण्याचे काम पुरातत्त्व विभाग करणार आहे.
या 21 फुटी दगडाला गावकरी आराध्य दैवत मानून त्याची पूजा करता. गावातील प्रत्येक व्यक्ती आणि गावकरी चांगल्या कार्याच्या अगोदर याची पूजा करतात.
हेही वाचा - संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावं, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
परिसरात बलदेव बाबा म्हणून प्रसिद्ध असून माना जातीतील लोक याला त्यांचे कुलदैवत मानतात. या कुलदैवताकडे जी मागणी केल्यास ती पूर्ण होते, असा या लोकांचा विश्वास आहे. याच गावात शासकीय जागेवर गोल गोल वर्तुळात बसविलेले बरेच दगड आहेत. पुरातन विभागाने या सर्वांची तपासणी करून या सर्व पौराणिक गोष्टींचा मागचा इतिहास काय याचा शोध घ्यावा, तसेच त्याचे संगोपन करावे, अशी मागणी गावकरी करीत आहेत.