बीड- ‘घ्या रे याला गाडीत, आज ह्याला जीवंत सोडायचे नाही’ असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करुन लाथा बुक्क्यांनी एका तरुणाला मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे सुपूत्र नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह इतर चार जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.
हेही वाचा- नाथाभाऊंसाठी पक्षाने वेगळा प्लॅन आखला असेल - पंकजा मुंडे
पीडित तरुण हा नगर रोडवरील जिल्हा न्यायालयासमोरुन जात असताना योगेश भारतभूषण क्षीरसागर, देवीदास रावसाहेब जाधव यांच्यासह तीन जणांनी त्याला अडवून जातीवाचक शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांसह काठीने मारहाण केली. यावेळी योगेश क्षीरसागर याने ‘घ्या रे याला गाडीत, जीवंत सोडायचं नाही,’ असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण केली.
या प्रकरणी पीडित तरुणाच्या तक्रारीवरुन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नगरसेवक योगेश क्षीरसागर यांच्यासह देवीदास रावसाहेब जाधव आणि अन्य तीन जणांविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून या प्रकरणाचा अधिक तपास डीवायएसपी स्वप्नील राठोड करीत आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी पोलीस पथकाने घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.