बीड - व्यंकटेश्वरा कंपनीने ( Venkateswara Company ) अत्यंत बिकट अवस्थेत असलेला अंबासाखर कारखाना ( AmbaSakhar factory ) भाडे तत्वावर चालवण्यासाठी घेतला. साफ नियत ठेऊन कारभार केल्याने मागील वर्षी अत्यंत कमी वेळेत सुमारे सव्वा दोन लाख टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले, याही वर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू होत असून, यावर्षी साडेचार लाख ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट कारखाना प्रशासनाने ठरवले असल्याचे धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) म्हणाले.
गळीत हंगामाचा शुभारंभ - व्यंकटेश्वरा कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ आज माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्यासह अखिल भारतीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले व अन्य मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. अंबाजोगाई तालुक्यासह परळी मतदारसंघ, केज मतदारसंघ आदी विविध भागातील हजारो शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित हा कारखाना असल्याने इथे कोणत्याही पद्धतीने राजकारण होणार नाही. नोंदणीच्या कार्यक्रमाप्रमाणे उसाची तोड केली जावी, अशा सूचनाही धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना संबंधितांना केल्या.
इतर कारखान्यांच्या तुलनेत चांगला भाव - अनेक शेतकऱ्यांना कारखाना उसाला भाव काय देणार असा प्रश्न पडला असेल, काळजी करू नका, कारखाना प्रशासन इतर कारखान्यांच्या तुलनेत चांगला व योग्यच भाव देईल, असे आश्वासनही यानिमित्ताने बोलताना धनंजय मुंडे यांनी दिले. यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, माजी आ. संजयभाऊ दौंड दत्ता आबा पाटील आदींची मनोगते झाली तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्यंकटेश्वराचे मुख्याधिकारी राजेंद्र जंगम यांनी केले.