बीड - एकीकडे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार 33 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करत आहेत, तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात वनविभागाच्या आशीर्वादाने सर्रास वृक्षतोड सुरू आहे. याकडे बीडच्या वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी बीड जिल्ह्यातील वृक्षतोडीकडे विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यावरण प्रेमी सुधाकर देशमुख यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने केली आहे.
बीड जिल्ह्यातील पिंपळनेर, चौसाळा, पाटोदा आदी भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. बीड तालुक्यातील पिंपळनेर भागातून दिवसाढवळ्या वृक्षतोड करून ओली लाकडे वाहून नेली जातात. याकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे. मोसमी पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पाऊस पडताच जून-जुलै महिन्यात 33 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्याच्या वनविभागाने हाती घेतला आहे. असे असतानादेखील बीड जिल्ह्यात वनविभागाच्या आशीर्वादाने सर्रास वृक्षतोड सुरू आहे. या सर्व बाबींचा फटका पर्यावरणाला बसत आहे.
बीडचे जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे यांनी बीड जिल्ह्यात होत असलेल्या वृक्षतोडीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन वृक्षतोड रोखावी, अशी मागणी पर्यावरण दिनाच्या निमिताने कुंदेवाडी येथील शेतकरी परमेश्वर चन्ने यांनी केली आहे.
बीडच्या वनविभागाकडे यापूर्वी अनेक वेळा वृक्षतोडीबाबत शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे. असे असतानादेखील वनविभागाकडून या तक्रारींकडे दुर्लक्ष केले गेले. बीड जिल्ह्यात रोपवाटिकांमधून अनेक रोपे तयार झालेली आहेत. ती रोपे आता जूनमध्ये लावून वृक्ष संगोपनाचे काम हाती घेतले जाणार आहे. मात्र, या सगळ्या महत्वकांशी उपक्रमाचे बीड वनविभाग कार्यालयाला काहीही घेणे-देणे नसल्याचे पहायला मिळत आहे. होत असलेल्या वृक्षतोडीवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.