बीड- कोरोना विषाणूच्या संकटामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. जोतो आपापल्या घरात बसून अदृश्य विषाणूशी लढा देत आहे. मात्र, बीडमध्ये आशा वर्कर म्हणून काम करणाऱ्या एका हिरकणीने 8 महिन्यांची चिमुकली मुलगी असताना देखील कर्तव्य म्हणून कोरोनाच्या युद्धात उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला आहे. मुलगी आजारी असताना मुलीची जबाबदारी जाऊबाई वर सोपवून आशा वर्करने कर्तव्य श्रेष्ठ मानत गावात सर्वे केला. आज जागतिक मातृत्व दिनाच्या निमित्ताने बीडच्या या लढवय्या मातेच्या कर्तृत्वाचा 'ईटीव्ही भारत' ने घेतलेला हा विशेष आढावा.
हेही वाचा- मुंबईत आज नवीन 722 कोरोनाग्रस्तांची नोंद, एकूण आकडा 12 हजार 689
जिल्ह्यातील चाकरवाडी येथे आशा वर्कर म्हणून काम करणाऱ्या सुनीता श्रीराम बोराडे यांच्या कुटुंबात पती व 8 महिन्याची चिमुकली राहते. पती श्रीराम रिक्षा चालवतात. तर सुनीता आशा वर्कर आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या 8 महिन्याच्या बाळाला (श्रुती) सांभाळत कोरोनाच्या लढाईत सुनीता यांनी सहभाग नोंदवला आहे. मागील 40 दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चाकरवाडी गावाच्या आरोग्याची काळजी सुनीता घेतात.
कामाच्या नियोजनाबाबत सुनीता सांगतात, पहाटे 5 ला उठून घरातील सर्व कामे आवरुन, नवऱ्याचा डब्बा बनवून ठेवते. मुलीला दूध देऊन सकाळी 8 वाजता घराबाहेर पडते.सर्वेच्या कामावरुन परत येईपर्यंत बाळाला जाऊबाईच्या घरात झोपवते. सर्वेसाठी गावात जाताना आरोग्य विभागाने सर्दी आणि तापीच्या दिलेल्या गोळ्या तसेच नोंदवही, तोंडाला मास्क व सोबत सॅनिटायझर घेऊन गावातील प्रत्येक घरी आणि वस्त्यांवर जाऊन कोणी आजारी आहे का? अथवा गावात इतर जिल्ह्यांमधून कोणी नवीन व्यक्ती आलेला आहे का?, आला असेल तर त्याची प्रकृती कशी आहे?, याची इतंभूत माहिती नोंद करते. आणि आरोग्य विभागाला माहिती देते. गेली चाळीस दिवसांपासून मी हे काम करते.
बाळाची काळजी वाटते पण...
चाकरवाडी येथे मी 2009 पासून आशा वर्कर म्हणून काम करते. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत काम करताना मला माझ्या चिमुकलीची काळजी वाटते. पण आज संपूर्ण देश कोरोनाशी लढतो आहे. यामध्ये मोठ-मोठे डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कामगार देखील या बिकट परिस्थितीत काम करीत आहेत. मला कामातून किती पैसे मिळतात यापेक्षा आरोग्य विभागाने माझ्यावर दीड-दोन हजार लोकवस्ती असलेल्या गावाची जबाबदारी दिली आहे. याची आठवण ठेवून महिन्याला केवळ दोन हजार रुपये मानधनावर मी अत्यंत निष्ठेने काम करतेय, असे सुनिता यांनी सांगितले.
अन् मी त्यादिवशी खूप रडले...
देशावर कोरोना विषाणूचे संकट आले आणि आम्हा सर्व आशा वर्कर यांना आरोग्य विभागाकडून निरोप आला की, तुम्ही गावात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वे करा. विशेष म्हणजे त्या दिवशी माझी चिमुकली आजारी होती. माझ्यावर दबाव आला. आधी बाळाला दवाखान्यात घेऊन जावे की, सर्वे करायचा. अखेर माझ्या बाळाची जबाबदारी जाऊबाई यांच्याकडे सोपवून मी सर्वेसाठी घराबाहेर पडले. जवळ कुठल्या सुविधा नाहीत. आरोग्य विभागाने दिला आहे तो एक मास्क आणि सॅनिटायझरची बॉटल एवढेच काय ते घेऊन मी उन्हात फिरुन सर्वे केला. सर्वेवरुन घरी आल्यानंतर मला माझ्या मुलीला जवळ घेऊन तिला दूध द्यावे लागते. त्यामुळे आपल्यामुळे आपल्या बाळाला काही होऊ नये यामुळे मी खूप रडले. मात्र, दुसऱ्या दिवशी सगळं ठीक झाले व मी पुन्हा सर्वेसाठी घराबाहेर पडले.
शासनाने आशा वर्कर यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा..
आरोग्य विभाग असो की, इतर कुठल्याही विभागाची गावपातळीवर कुठलीही योजना राबवायची असली की, शासन आशा वर्कर यांच्यावर जबाबदारी देते. असे असतानाही 60 ते 70 रुपये रोजाने या अशा वर्कर रात्रंदिवस काम करतात. कोरोनाच्या या युद्धामध्ये आशा वर्कर यांची भूमिका महत्त्वाची राहिलेली आहे. त्यामुळे आता तरी महाराष्ट्र शासनाने आशा वर्कर यांना 10 हजार रुपये महिना व शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन आंधळे यांनी केली आहे.