बीड - कृषी व्यवसायाला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळले. मात्र, मागील वर्षभरात दोन वेळा व्यवसायावर संकट आले आहे. पहिल्यांदा आला कोरोना त्यानंतर सध्या बर्ड फ्लूच्या संकटाने आम्हाला उद्ध्वस्त केले. चिकनची मागणी मोठ्या प्रमाणात घसरल्यामुळे 80 ते 90 रुपये किलोने विकणारी कोंबडी आता 30 ते 40 रुपये किलोने विकत आहोत. सात लाख रुपये गुंतवणूक करून तीन हजार कोंबड्या पक्षी केले मात्र बर्ड फ्लूमुळे होत्याचे नव्हते झाले, कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे, अशी कैफियत बीड तालुक्यातील कुक्कुटपालन व्यावसायिक गणेश राऊत यांनी मांडली.
बीड जिल्ह्यात साडे पाचशे ते सहाशे खासगी पोल्ट्री फार्म आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन व्यवसायाकडे मागच्या तीन वर्षात वळलेले आहेत. मात्र, जानेवारी 2020 नंतर पोल्ट्री फार्म व्यवसायाला घरघर लागली. अगोदर कोरोनाचे संकट आले. त्यावेळी बीड जिल्ह्यात पशुपालकांनी शेकडो जिवंत कोंबड्या खड्डे खोदून पुरून टाकल्याचे पशुपालक गणेश राऊत म्हणाले.
चिकन खाल्ल्यामुळे होत नाही बर्ड फ्लू...
कोणतेही अन्न आपण शिजवल्याशिवाय खात नाहीत. आतापर्यंत पक्षांमधून माणसांमध्ये बर्ड फ्लू आल्याचे एकही प्रकरण ऐकीवात नाही. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई जवळील लोखंडी सावरगाव येथे केवळ दहा ते बारा पक्षांमध्ये बर्ड फ्लू असल्याचे समोर आलेले आहे. नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. चिकन किंवा मटण आपण किमान अर्धा ते एक तास शिजवतो. सत्तर ते ऐंशी डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानात शिजवलेल्या अन्नामध्ये कुठलाच विषाणू जिवंत राहू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे यातून बर्ड फ्लूचा धोका शक्य नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षामधील हा फ्लू माणसात आला आहे, असे एकही उदाहरण नाही, असे पशुसंवर्धन उपायुक्त सूर्यकांत सूर्यवाड यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितले.
शासनाच्या मदतीची गरज-
शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्म व्यवसायाकडे शेतकरी वळतात. मात्र वर्षातून दोन वेळा महामारी च्या संकटामुळे चिकन व्यवसायात मंदी येते. याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतो. एवढेच नाही तर शासनाच्या मदतीशिवाय पोल्ट्री फार्म सुरू केलेल्या शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. नाळवंडी येथील पशुपालक गणेश राऊत या शेतकऱ्यांनी सहा ते सात लाख रुपयांची गुंतवणूक करून 3 हजार कोंबड्या केल्या. मात्र अचानक बर्ड फ्लू मुळे पोल्ट्री फार्मला गुंतवलेली रक्कम देखील मिळणे कठीण झाले आहे. हे सगळे संकट येण्यापूर्वी 80 ते 90 रुपये किलो ने कोंबडी विकली जायची. मात्र आता 30 ते 40 रुपये किलो कोंबडी विक्री करावी लागते. ही परिस्थिती बीड जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये निर्माण झालेली असून शासनाने या कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी विशेष मदत जाहीर करावी अशी मागणी देखील आता होऊ लागली आहे.
एकंदरीतच पशुसंवर्धन विभागातील तज्ञांच्या म्हणण्यानुसार चिकन किंवा मटण खाल्ल्यामुळे बर्ड फ्लू होत नाही. ही वस्तुस्थिती असताना देखील केवळ अफवा व गैरसमज यामधून नागरीक चिकन विकत घेत नाहीत. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेला याचा मोठा फटका बसत आहे. जास्त शेतकऱ्यांनी मोठा कष्टातून पोल्ट्री फार्म शासनाच्या मदतीशिवाय सुरू केलेला आहे अशा शेतकऱ्यांचे अक्षरशः दिवाळे निघत आहे.