बीड - वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना देखील हॉस्पिटल चालवणाऱ्या परळीच्या सुदाम मुंडेला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशाने बोगस डॉक्टर शोध समितीने कारवाई करत मुंडेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी सुदाम मुंडेला अटक करुन परळी न्यायालयासमोर हजर केले होते. दरम्यान, सुदाम मुंडेंच्या दवाखान्यातून गर्भपातासाठी लागणारी औषधी, एक्सरे मशीन आणि ऑक्सिजन बेड जप्त करण्यात आले आहेत. बेकायदा थाटलेल्या दवाखान्यात सुदाम मुंडे गंभीर रुग्णांवर देखील उपचार करीत होता, अशी माहिती आहे.
कोण आहे सुदाम मुंडे -
बीड जिल्ह्यातील स्त्रीभ्रूण हत्येच्या घटनांनी 8 वर्षांपूर्वी राज्यात खळबळ माजली होती. यातील प्रमुख ‘कलाकार’ असलेल्या परळीच्या डॉ. सुदाम मुंडेला विजयमाला पाटेकर या महिलेच्या बेकायदा गर्भपात आणि मृत्यू प्रकरणात 10 वर्षाची शिक्षा झाली होती, तर महाराष्ट्र वैद्यक परिषदेने (एमसीआय) त्याचा वैद्यकीय व्यवसायाचा परवाना रद्द केला होता. 10 वर्षांची शिक्षा झालेला सुदाम मुंडे काही महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. जामिनावर बाहेर आल्यानंतर सुदाम मुंडेने परळी तालुक्यातील रामनगर भागात बेकायदा दवाखाना थाटला होता. याची तक्रार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना मिळाल्यानंतर त्यांनी बोगस डॉक्टर शोध समितीकडे प्रकरण पाठवून कारवाईचे निर्देश दिले होते.