बीड - परळी येथे रेल्वे पटरीच्या बाजूला काट्याच्या कुंपनात एका तासापूर्वी जन्मलेले स्त्री जातीचे अर्भक सोमवारी रात्री आठ वाजता सापडले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. सापडलेल्या अर्भकाची आई कोण? असा प्रश्न उभा राहिला होता. अखेर पोलिसांनी अवघ्या अकरा तासांमध्ये 'त्या' अर्भकाच्या आईला शोधून काढले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्भकाची आई कुमारीमाता असल्याचे समोर येत आहे.
हेही वाचा - लोकनियुक्त सरपंच पद्धत होणार रद्द, विधानसभेत विधेयक मंजूर
परळी शहरात रेल्वे पटरीच्या बाजूला सोमवारी रात्री आठ वाजता स्त्री जातीचे एका तासापूर्वी जन्मलेले अर्भक आढळून आले होते. त्या अर्भकाची आई कोण याचा तपास परळी शहर पोलिसांनी लावला आहे. परळीत शहरातील एका कुमारी मातेचे ते बाळ असल्याचे पोलीस चौकशीत समोर येत आहे. पोलिसांनी कुमारी मातेला ताब्यात घेतले असून, पुढील चौकशी सुरू आहे. सापडलेल्या बाळाची प्रकृती चांगली असून, परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे डॉ. रांदड यांनी सांगितले. अशा घटनेचा आम्ही निषेध करत असून, संबधीत बाळाला दत्तक घेत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष संतोष मुंडे यांनी सांगितले.
हेही वाचा - साखर कारखान्यांकडे ऊस उत्पादकांचे २,४०० कोटी रुपये थकित