बीड - शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय केला तर चार पैसे मागे पडतील. या अपेक्षेने दुग्ध व्यवसाय करणारे गवळी आणि दूध उत्पादक शेतकरी सध्याचा दुष्काळ आणि चाराटंचाईमुळे संकटात सापडले आहेत. सध्याच्या स्थितीत पशुपालकांना कडब्याची एक पेंडी पन्नास रुपयाला विकत घ्यावी लागते. तर दुसरीकडे शासनाकडून प्रति लिटर दुधाला केवळ पंचवीस रुपये भाव दिला जात आहे, अशा बिकट परिस्थितीत दुग्ध व्यवसाय करायचा कसा? असा प्रश्न बीड जिल्ह्यातील दूध उत्पादकांना पडला आहे.
बीड जिल्ह्यात दर दिवशी एकूण सव्वा दोन लाख लिटरच्या जवळपास दूध संकलन केले जाते. यामध्ये अंबाजोगाई येथील शीतकरण केंद्रात प्रत्येक दिवशी 22 हजार लिटर दूध संकलन होते. याशिवाय सहकारी दूध केंद्रांवर रोज दीड लाख लिटर तर खासगी दूध संकलन केंद्रांवर रोज 18 हजार लिटर दूध संकलन केले जाते. शासनाकडून गायीच्या दुधाला प्रति लिटर 25 रुपये तर म्हशीच्या दुधाला 34 रुपये भाव दिला जातो. मात्र, दूध उत्पादकांना मिळणारा हा भाव अत्यल्प आहे.
आज घडीला एका कडब्याच्या पेंडीची किंमत 50 रुपये असताना दुधाला मिळणारा भाव मात्र, लिटरला पंचवीस रुपये एवढाच मिळत आहे. या सगळ्या परिस्थितीत दुग्ध व्यवसाय करायचा कसा? असा सवाल बीड जिल्ह्यातील पशू पालक उपस्थित करत आहेत.
ऑगस्ट 2018 ते जानेवारी 2019 या सहा महिन्यासाठी शासनाने दूध पावडरसाठी दूध घालणाऱ्या दूध उत्पादकांना लिटरमागे 5 रुपये अनुदान दिले. मात्र, आता एक फेब्रुवारीनंतर दूध पावडरसाठी दूध देणाऱ्या दूध उत्पादकांना शासनाचे 5 रुपये मिळणेदेखील बंद झाले आहेत. त्यात दुष्काळामुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या चारा टंचाईमुळे कडब्याचे भाव गगनाला भिडले आहेत, अशा परिस्थिती दुधाला मिळणारा भाव अत्यल्प असल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे.
चारा टंचाईमुळे विकावी लागतायात जनावरे-
गेल्या चार महिन्यापासून दुष्काळाचा तडाखा बसू लागला आहे. त्यामुळे जनावरांना खायला काय टाकायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मोठा तोटा सहन करून ४ म्हशी विकव्या लागल्या असल्याची प्रतिक्रिया बीड तालुक्यातील टाकळगव्हाण येथील शेतकरी उद्धव बागलाने यांनी दिली आहे.
कडब्याची पेंडी पन्नास रुपयाला विकत घ्यावी लागत आहे. दुधाला भाव मिळतो 25 ते 30 रुपये माझ्याकडे तीन म्हशी आहेत. शेतीला जोड व्यवसाय म्हणून आम्ही दुग्ध व्यवसाय करतो. यासाठी आमचे संपूर्ण कुटुंब दिवसभर कुटुंब राबते. मात्र चाऱ्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दुष्काळाचा मोठा तडाखा सहन करावा लागत असल्याने हातात काहीच शिल्लक राहत नसल्याची प्रतिक्रिया येथील मीरा बागलाने या शेतकरी महिलेने ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.