बीड: शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःला पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न एका कर्मचाऱ्याने केला आहे. काल (20 फेब्रुवारी ) सकाळी 11.00 च्या दरम्यान ही घटना घडली. जखमी इसमाचे शरीर 90% भाजले गेल्यामुळे त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे प्रकरण: शाम भाऊराव काळे हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून सेवा करीत आहे. शाम काळे याने एक 24 जानेवारी रोजी महिन्यांपूर्वी दादा मुंडे आणि सचिन सलगर यांच्याकडून विजय जावळे यांच्या घरात 10% व्याजाने 3 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात शाम काळे याला ते तिघेजण त्याचे घर त्यांच्या नावावर लिहून दे, अशी मागणी करीत होते. म्हणून शाम याने दि. 18 फेब्रुवारी रोजी त्यांना स्टॅम्प पेपरद्वारे स्वतःचे रहाते घर लिहून दिले होते.
अशी घडली घटना: दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 च्या दरम्यान दादा मुंडे, सचिन सलगर आणि विजय जावळे यांनी त्याला कॉलेजवर जाऊन बळजबरीने त्यांच्या चारचाकी गाडीत बसविले. तिघांनी त्याला बळजबरीने गाडीत बसवून आता घराची रजीष्ट्री आमच्या नावाने करून दे म्हणून दबाव टाकला आणि शाम काळे याला ते तिघे केजकडे घेऊन आले. त्यांच्या त्रासाला कंटाळून व वैफल्यातुन शाम याने काळे याने केजवळ आल्यानंतर गाडी थांबताच स्वतःला पेटवून घेतले. शाम याची प्रकृती चिंताजनक असून व्याजाच्या पैशात घर जाण्याच्या भीतीने शाम याने स्वतः आत्मदहन केल्याचे सांगितले जात आहे.
जखमीची प्रकृती चिंताजनक: घटनेची माहिती होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहे. पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस नाईक त्रिंबक सोपणे यांनी जखमी शाम काळे याचा स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील जळीत वार्डात जबाब नोंदवून घेतला आहे. शाम काळे हा 90% भाजला गेला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.