बीड - सध्या कोरोनाची बिकट परिस्थिती असल्याने अंत्यविधीला जास्त लोक एकत्र येणे शक्य नाही. अशा परिस्थितीत वृद्धापकाळाने मृत्यू झालेल्या आईला तिच्या चार मुलींनी खांदा दिला तर पाचव्या मुलीने मुखाग्नी देऊन अंत्यविधी पूर्ण केला. मुलगा नसल्याने मुलींनी केलेल्या अंत्यविधीची मोठी चर्चा बीड जिल्ह्यात होत आहे.
लहान मुलीने दिला मुखाग्नी -
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यातील जांब येथील रहिवासी लक्ष्मीबाई रामभाऊ कांबळे यांचे वृध्दापकाळाने दिनांक 20 मे रोजी पहाटे 4 च्या सुमारास निधन झाले. कोविडचा प्रादुर्भाव असल्याने जास्त लोक अंत्ययात्रेस जमा झालेले नव्हते. त्यात लक्ष्मीबाई यांना मुलगा नसल्याने उत्तराधिकारी व खांदेकरी याची गरज न भासू देताच लक्ष्मीबाई यांच्या 4 मुली सुनिता केदार, विमलबाई केदार, शशिकला केदार आणि भीमाबाई मोरे या मुलींनी खांदा दिला. कचराबाई खंडागळे या मुलीने सर्व उर्वरित तयारी केली. तर शंकुतला सुतार या लहान (पाचव्या) मुलीने मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कार पूर्ण केला. त्याठिकाणी गावातील काही मंडळी, नातेवाईक अंत्यसंस्काराला उपस्थित होते. या घटनेमुळे गावात व आसपासच्या परिसरात महिलांनी केलेल्या या अंत्यसंस्काराचे सर्वत्र कौतुक व चर्चा केली जात आहे.
हेही वाचा - पंजाबच्या मोगामध्ये कोसळलं हवाई दलाचं मिग-२१ विमान; जवान हुतात्मा