बीड - अंगणामध्ये कपडे वाळत घालताना विजेचा धक्का लागल्याने मावशी आणि भाचीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना केज तालुक्यामधील शिंदी येथे घडली. एकाच कुटुंबातील दोघींचा मृत्यू झाल्यामुळे शिंदी गावावर शोककळा पसरली आहे. रेणुका अशोक थोरात (वय 20, हमु.शिंदी, रा.खंडेश्वरी ता.कळंब जि.उस्मानाबाद) आणि अश्विनी भागवत जोगदंड (वय 15, रा.लोणगाव ता.माजलगाव जि.बीड) अशी अनुक्रमे मृत मावशी आणि भाचीचे नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, रेणुका थोरात या दिवाळीच्या सुट्या असल्याने माहेरी आल्या होत्या. घराबाहेरील अंगणामध्ये कपडे वाळवण्यासाठी बांधलेल्या तारेजवळून घरातीलच एक वायर गेली होती. वायर काहीशी तुटून विद्युत प्रवाह तारेमध्ये उतरला होता. या तारेला हात लागल्याने रेणुका यांना विजेचा धक्का बसला. त्या अवस्थेत त्यांना पाहुन बाजूला असलेली त्यांच्या बहिणीची मुलगी अश्विनीने त्यांना पकडले. यात दोघींनाही विजेचा जोराचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच केज पोलीस ठाण्याचे सपोनि. मिसळे यांच्यासह बीट अमंलदार पो.हे. कॉ. बाळकृष्ण मुंडे, सोनवणे, मपोकॉ.चौरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद झाली.