बीड - माजलगाव तालुक्यातील सिमरी पारगांव शिवारात शॉर्टसर्किटमुळे साडेआठ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या घटनेचे तत्काळ पंचनामे करावे, तसेच नुकसान भरपाईची द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
अचानक स्पार्क झाल्यामुळे उसाच्या फडाला आग -
माजलगाव तालुक्यात सिमरी पारगांव शिवारातील गट नंबर १२४ मध्ये लालू गणपतराव चव्हाण (दिड एकर), साहेबराव जाधव (एक एकर), बाळराजे बालासाहेब जाधव (तीन एकर), पुरुषोत्तम बालासाहेब जाधव (तीन एकर) या शेतकऱ्यांचा ऊस होता. या उसाच्या फडा जवळून विद्युत तार गेलेली आहे. सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान अचानक स्पार्क झाल्यामुळे उसाच्या फडाला आग लागली. बघता- बघता वरील चारही शेतकऱ्यांच्या शेतीतला ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी आल. यादरम्यान ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने साडेआठ एकर पेक्षा अधिक ऊस जळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
विद्युत विभागाचा भोंगळ कारभार -
बीड जिल्ह्यात यापूर्वी देखील उसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. विद्युत विभागाकडून विद्युत तारांचे मेन्टेनन्स वेळेवर व व्यवस्थित न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाच्या फडाला आग लागण्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडत आहेत. या सगळ्या प्रकारामुळे होत असलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न ऊस मालकांनी उपस्थित केला आहे. जळालेल्या उसाचे पंचनामे करून तत्काळ भरपाई द्या, अशी मागणी देखील यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे.
हेही वाचा - बर्ड फ्लूसाठी ठाणे महानगरपालिकेत नियंत्रण कक्षाची स्थापना