बीड - फेसबुकवर झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत नंतर प्रेमात झाले. लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतर पळून जात असताना केज पोलिसांनी 'त्या' सैराट जोडप्याला पकडले. चौकशी केल्यानंतर त्या मुलीला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिल्याने त्या प्रेमीयुगुलांची सैराट होण्याची योजना फसली. ही घटना बुधवारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे, मुळचा गोरखपूर (उत्तर प्रदेश) येथील मुलगा मुंबई येथे एका फर्निचर दुकानात कामाला आहे. त्याची बीड येथील एका मुलीशी फेसबुकवर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. ठरल्याप्रमाणे तो मुलगा बीडमध्ये आला मुलगीही तयारीत होती. बसस्थानकातून ते दोघे अंबाजोगाईला जाणाऱ्या बसमध्ये चढले. कोणाला संशय येवू नये म्हणून दोघे एकत्र न बसता वेगळे बसले. औरंगाबाद-अंबाजोगाई ही बस अंबाजोगाईच्या दिशेने निघाली. त्या बसमध्ये काही टवाळखोर मुलांनी मुलीला एकटी पाहून छेडण्यास सुरूवात केली. छेडछाडीचा प्रकार लक्षात आल्याने वाहकाने वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. वाहतूक कक्षाने बसच्या ठिकाणावरून केज पोलिसांना ही माहिती दिली.
छेडछाडीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तात्काळ पोलीस उपअधीक्षक अशोक आम्ले, पोलीस निरीक्षक पुरूषोत्तम चोबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मारूती मुंडे हे बसच्या दिशेने गेले. बस बीड-केज मार्गावरील उमरी पाटी जवळच्या साखर कारखान्याजवळ आली असता पोलिसांनी थांबविली. पण, छेड काढणारी मुले त्यापूर्वीच मस्साजोग येथेच उतरून पसार झाले होते.
पोलिसांनी त्या तरुणीची चौकशी केली असता तिने पोलिसांना सांगितले, की ती मूळची बीड येथील आहे. परंतु सध्या ती औरंगाबाद येथे राहत आहे. तसेच ती याच गाडीतून तिच्या प्रियकराच्या सोबत प्रवास करत आहे. मात्र, कुणाला संशय येऊ नये म्हणून एकमेकांपासून लांब बसले होते. ही माहिती कळताच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती मुंडे व वाहन चालक हनुमंत गायकवाड यांनी सैराट जोडप्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी त्या तरुणीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आणि तिला तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केले. तरूणीच्या परप्रांतीय प्रियकरास पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांकडे पाठवून दिले.
हेही वाचा - बीड: महिलांच्या सुरक्षेसाठी बीड पोलीस राबवणार 'ऑपरेशन कवच' मोहीम