बीड - आम्हाला कपाशीच्या लागवडीसाठी एकरी 25 हजार रुपये खर्च आला आहे. यंदा सुरुवातीला पाऊस देखील चांगला झाला होता. त्यामुळे उत्पादन चांगले होईल असे वाटले होते. मात्र कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक हातचे गेले. पिकातून झालेला खर्च देखील आता वसूल होणार नाही. वर्षाचा खर्च कसा भागवायचा अशा व्याथा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ईटीव्हीशी बोलतांना मांडल्या आहेत.
यावर्षी बीड जिल्ह्यात 4 लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड झाली. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच चांगला पाऊस झाला, त्यामुळे कापसाची झाडे हिरवीगार दिसत होती. कापूस जोमात आलाय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी वेळच्या वेळी फवारण्या व मशागत केली. मात्र सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळे कापसाच्या शेतात पाणी साचले. यामध्ये संपूर्ण जिल्ह्यात 90 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील कापसासह सोयाबीनचेही पीक वाया गेले. पावसाच्या तडाख्यातून जे काही थोडेफार कापसाचे पीक वाचले होते. त्याच्यावरही आता बोंडअळी पडल्याने बळीराजा संकटात सापडा आहे.
व्याजाने पैसे घेऊन आम्ही कापसाची लागवड केली, पीक चांगले आले म्हणून सात- आठवेळा फवारण्या देखील केल्या. मात्र फवारण्याचा काहीच उपयोग झाला नाही. कापसावर बोंडअळीचा प्रार्दुभाव झाल्याने पीक हातचे गेले आहे. आता हे पैसे कसे फेडायचे असा प्रश्न आम्हाला पडला असल्याचे कापूस उत्पादक शेतकरी मच्छिंद्र जोगदंड यांनी म्हटले आहे. तसेच सरकारने याची दखल घेऊन आम्हाला मदत करावी अशी मागणी जिल्ह्यातले शेतकरी करत आहेत.