बीड - बीड जिल्ह्यातील तोतया पोलिसाने शिर्डी येथे पोलीस असल्याचे भासवून महिलेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली. पोलीस भरतीत मदत करतो, असे सांगून तोतया पोलीसाने तिच्याशी शारीरीक संबध जोडून लग्न करण्याचे आश्वासन दिले. तसेच मारहाण करत तिची फसवणूक केल्याप्रकरणी तोतया पोलीसाविरोधात राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
राहाता पोलीसात महिलेने दिली तक्रार-
बीड जिल्ह्यातील हिवराफाडी येथील किरण महादेव शिंदे याने शिर्डी येथील महीलेशी सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख होवून मैत्री केली. तसेच पोलीस असल्याचे बनावट आयकार्ड व फोटो दाखवत शिर्डी पोलीस ठाण्यात नोकरीस असल्याचे भासवून तिच्याशी सबंध वाढविले. तुला पोलीस भरतीत मदत करतो, तू नवऱ्याला सोडून, दे माझ्याशी लग्न कर, असे सांगून तिच्याशी शारीरीक संबध ठेवले. नंतर तो तोतया पोलीस असल्याचा तक्रारदाराला संशय आल्याने तिने त्यास विचारणा केली असता महिलेस लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर राहाता पोलीसात महिलेने तक्रार दिली.
तोतया पोलीसाच्या विरोधात 376 नुसार गुन्हा दाखल-
तिची तक्रार नोंदवून घेत पोलीसांनी सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याची झाड झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट पोलीसाचे आयकार्ड, पोलीस ड्रेस व फोटो सापडले. या प्रकरणी तोतया पोलीसाच्या विरोधात 376 नुसार राहाता पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत कंडोरे हे करत आहेत.
हेही वाचा- शिवसेना बंगाल निवडणूक लढवणार नाही, ममता बॅनर्जींना दिला पाठिंबा