बीड - सध्या चीनच्या सीमेवरील कुरापतींमुळे भारत-चिनी संबंध चिघळले आहेत. या अनुषंगाने बीड भाजपच्यावतीने गुरुवारी चिनी वस्तूंची होळी करण्यात आली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी स्वदेशीचा नारा दिला. चीनमधून होणारी आयात थांबवली पाहिजे. तिथून आलेल्या वस्तू वापरणार नाही, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सांगितले.
चीनकडून भारतीय सैन्यावर हल्ला झाल्यानंतर संपूर्ण देशात चीन विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. चीनच्या भारतविरोधी कृत्याचा निषेध म्हणून बीडमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली आज निषेध व्यक्त करण्यात आला. चिनी बनावटीच्या लॅपटॉप, कॉम्प्युटरसह अनेक वस्तूंची होळी करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी चीन विरोधात घोषणाबाजी केली. आजपासून चिनी वस्तू वापरावर कायम बंदी राहील, अशी सामुहिक शपथ देखील बीडमधील भाजप कार्यकर्त्यांनी घेतली.
१६ जूनला गलवान व्हॅली परिसरात भारत आणि चीन सैन्यात चकमक उडाली. यावेळी झालेल्या झटापटीत 20 भारतीय सैनिकांना विरमरण आले तर चीनचेही काही सैनिक यात मारले गेले. मात्र, त्यांनी माहिती उघड केली नाही. दोन्ही देशांच्या दरम्यान असलेला तणाव कमी करण्यासाठी आणि सीमेवरील परिस्थिती पूर्व पदावर आणण्यासाठी दोन्ही देशांतील मेजर जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.