बीड - मराठा समाजाला आरक्षण मिळण्याबाबत पुनर्विचार याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर आता उशिरा का होईना भाजपा आमदार सुरेश धस मराठा समाजासाठी मैदानात उतरले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमदार सुरेश धस यांनी सोमवारी (28 जून) बीड शहरात मोर्चा काढला.
बीड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून या मोर्चाला सुरुवात झाली. सुभाष रोड मार्गे माळीवेस चौक, बलभीम चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला. यावेळी कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीने संपूर्ण बीड शहर दणाणून गेले होते.
'आता तरी आघाडी सरकारने भक्कमपणे बाजू मांडावी'
'मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात आजवर अनेक मोर्चे, आंदोलने झाली आहेत. भाजपा सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. मात्र, आघाडी सरकारच्या हलगर्जीपणामुळे आरक्षण रद्द झाले. आता पुन्हा नव्याने पुनर्विचार याचिका न्यायालयात दाखल झाली आहे. आता तरी आघाडी सरकारने न्यायालयात मराठा समाजाच्या बाजूने भक्कमपणे भूमिका मांडून मराठा समाजाला न्याय द्यावा', अशी मागणी यावेळी सुरेश धस यांनी केली.
धसांचा आघाडी सरकारवर आरोप
यावेळी सुरेश धस यांनी ठाकरे सरकारवर आरोप केले. 'मराठा समाजाचे प्रश्न म्हटले की हे सरकार कोरोनाचे कारण समोर करत आहे. येणाऱ्या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही तीव्रतेने लावून धरणार आहोत. या सरकारने न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा गांभीर्याने विचार करून न्यायालयात भक्कमपणे मराठा समाजाची बाजू मांडावी', असे धस यांनी म्हटले.
हेही वाचा - पुण्यात कडक निर्बंध, दुपारी ४ नंतर ही दुकाने बंद, जाणून घ्या नवीन नियमावली