परळी - निसर्गाने साथ दिल्याने यंदा नागापूर (ता.परळी) येथील वाण प्रकल्पात भरपूर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे आसपासच्या अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी या प्रकल्पातून वाण नदी पात्रात पाणी सोडण्याची मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांनी केली आहे. याबाबत बीड जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाण धरणातील पाणीसाठा सध्या भरपूर प्रमाणात उपलब्ध असून ही निसर्गाची किमया आहे. परंतु नागापूर, लिंबोटा, नाथ्रा, बहादुरवाडी, पांगरी, दे.टाकळी, सबदराबाद, तडोळी, वडखेल आणि तळेगाव वरिल शिवारात सध्या पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची सध्या येथे टंचाई असून नदीपात्र कोरडे पडल्यामुळे विहिरी आटल्या आहेत.
परळीसह सर्व नळयोजना कार्यरत आहेत. ते पाणी शिल्लक ठेऊन बाष्पीभवन होणारे पाणी गृहीत धरुन धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. हेच पाणी नदीपात्रात सोडल्यास १५ पेक्षा अधिक गावांतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, मुक्या जनावरांना व उपलब्ध होऊ शकते. आम्ही १५ वर्षापासून वाण धरण शेतकरी कृति समितीच्या माध्यमातून पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा करित असून यावर्षीची परिस्थिती काहीशी बिकट असल्याने तातडीने पाणी सोडावे, अशी मागणी फुलचंद कराड यांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, पाटबंधारे विभागाचे का.अभियंता राऊत आदीनी यांनी त्वरित दखल घेऊन वाण धरणाचे पाणी सोडावे अशी मागणी फुलचंद कराड यांनी केली आहे.