बीड - लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना वीज वितरण कंपनीकडून अव्वाच्या सव्वा बिले दिली आहेत. या विरोधात शुक्रवारी बीडमध्ये महावितरण कार्यालयाला टाळे ठोकत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे महावितरण कार्यालय परिसर दणाणून गेला होता.
हेही वाचा - धक्कादायक.. पुणे-नगर महामार्गावर खोदकामात आढळला मानवी हाडांचा सापळा
बीड येथील विद्युत कंपनीच्या कार्यालयासमोर भाजपचे रमेश आडसकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी टाळे ठोकत आंदोलन झाले. या वेळी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'राज्य सरकारने लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीज बील दिले आहे. यामुळे नागरिकांमध्ये सरकार आणि महावितरण विभागाच्या विरोधात संताप निर्माण झालेला आहे.'
महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले
अगोदरच कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त असताना राज्य सरकारकडून नागरिकांवर अन्याय केला जात आहे. सरकारचा अन्याय यापुढे खपवून घेतला जाणार नाही. नागरिकांना दिलेले वाढीव वीज बिल तत्काळ रद्द करा, अशी मागणी देखील यावेळी आंदोलकांनी लावून धरली होती. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता भाजप कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले. या प्रसंगी बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - जालन्यात दुचाकी चोरट्यांना अटक; 6 दुचाकी जप्त