बीड- जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन, आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारल्यानंतर जखमी झालेल्या तरुणावर सकाळी 8 वाजेपर्यंत योग्य उपचार न झाल्याने, त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
अबोल अशोक भोसले (वय 31) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो तणावग्रस्त असल्याने त्याला दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याने मध्यरात्री तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी अपघात वॉर्डात दाखल करण्यात आले, मात्र आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणामुळे अबोलचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून आरोपांचे खंडण
दरम्यान या घटनेबाबत माहिती देताना अतिरिक्त शल्यचिकित्सक सुखदेव राठोड यांनी म्हटले आहे की, अमोल हा तणावग्रस्त होता. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्याने मध्यरात्री रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यात तो गंभीर जखमी झाला होता, त्यानंतर त्याला उपचारासाठी अपघात विभागात दाखल करण्यात आले. मात्र त्याच्यावर उपचार सुरू असताना सकाळी पावणेनऊच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयाकडून त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात येत होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी
अगोदरच कोरोना रुग्णांना वेळेवर न मिळणारे उपचार तसेच, रुग्णालयातील अस्वच्छता यामुळे जिल्हा रुग्णालय चर्चेत आले होते. दरम्यान आता पुन्हा एकदा उपचार सुरू असलेल्या रुग्णाने आत्महत्या केल्याने हे रुग्णालय पुन्हा चर्चेत आले आहे. योग्य उपचार न मिळाल्याने अबोलचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त करत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान या घटनेबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
हेही वाचा - 'सचिन वाझेंना कोणत्या तत्त्वावर पुन्हा मुंबई पोलीस दलात रुजू केले? मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे'